६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:58 IST2026-01-07T09:53:55+5:302026-01-07T09:58:24+5:30
नुकत्याच एका कार्यक्रमात जिनपिंग यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल असा खुलासा केला आहे, जो सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कठोर प्रतिमेमागे संघर्षाचा एक मोठा इतिहास दडला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात जिनपिंग यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल असा खुलासा केला आहे, जो सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वयाच्या १३ व्या वर्षी, जेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब संकटात होतं, तेव्हा एका आयरिश कादंबरीने त्यांना मानसिक आधार दिला आणि जगण्याची उमेद दिली, असे जिनपिंग यांनी सांगितले.
१३ व्या वर्षी कोसळला होता दुःखाचा डोंगर
बीजिंगमध्ये आयर्लंडचे पंतप्रधान मिशेल मार्टिन यांच्या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. १९६० च्या दशकात चीनमध्ये माओ झेडोंग यांची 'सांस्कृतिक क्रांती' सुरू झाली होती. त्यावेळी जिनपिंग यांचे वडील, जे उपपंतप्रधान होते, त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. अवघ्या १३ वर्षांच्या जिनपिंग यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अपमान, हिंसा आणि छळाचा सामना करावा लागला.
तुरुंगवास आणि गुंफेतील आयुष्य
जिनपिंग यांनी सांगितले की, त्या काळात त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्या आईचा सार्वजनिक अपमान करण्यात आला आणि त्यांच्या एका बहिणीला प्राणास मुकावे लागले. लाखों चिनी नागरिकांप्रमाणेच जिनपिंग यांनाही ग्रामीण भागात मजुरी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. काही काळ तर त्यांना एका गुफेमध्ये राहावे लागले, जिथे अन्नाचीही भ्रांत होती. अशा अत्यंत कठीण आणि एकाकी काळात 'द गॅडफ्लाय' या पुस्तकाने त्यांना सावरले.
काय आहे 'द गॅडफ्लाय'ची गोष्ट?
एथेल व्हॉयनिक यांनी १८९७ मध्ये लिहिलेली ही कादंबरी 'आर्थर बर्टन' नावाच्या एका तरुणाची कथा आहे. १९ व्या शतकातील इटलीमध्ये परकीय राजवटीविरुद्धच्या क्रांतीमध्ये हा तरुण सहभागी होतो. प्रचंड यातना आणि विश्वासघात सहन केल्यानंतर तो स्वतःच्या मृत्यूचे नाटक करतो आणि पुन्हा एक निडर क्रांतिकारी बनून परततो. त्याग आणि आत्मबलिदानाची ही कथा जिनपिंग यांच्या मनावर खोलवर बिंबली गेली.
चीनमध्ये का लोकप्रिय ठरलं हे पुस्तक?
हे पुस्तक जरी आयर्लंडमधील लेखिकेने लिहिले असले, तरी त्याचे सर्वाधिक वाचक चीन आणि सोव्हिएत युनियनमध्ये होते. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात ज्यांनी संघर्ष केला, त्यांना या पुस्तकातील नायकामध्ये स्वतःची प्रतिमा दिसत असे. या पुस्तकातील नायकाचा कठोर संकल्प आणि संयम यामुळेच शी जिनपिंग यांना स्वतःच्या आयुष्यातील वादळांशी लढण्याची ताकद मिळाली.