खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 08:25 IST2026-01-05T08:25:27+5:302026-01-05T08:25:38+5:30
Indian crew arrested Nigeria : नायजेरियाच्या लागोस बंदरात 'MV Aruna Hulya' या जहाजातून कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जहाजावरील कॅप्टनसह २२ भारतीय क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले आहे.

खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
लागोस (नायजेरिया): नायजेरियाच्या नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट एजन्सीने (NDLEA) अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. लागोस येथील मुख्य बंदरात एका मर्चेंट शिपवर छापा टाकून तब्बल ३१.५ किलोग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जहाजावरील कॅप्टनसह २२ भारतीय खलाशांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'एमव्ही अरुना हुल्या' नावाचे हे जहाज मार्शल आयलंड्सवरून रवाना झाले होते. शुक्रवारी (२ जानेवारी) हे जहाज लागोस येथील आपापा बंदरावर पोहोचले. गुप्तचर माहितीच्या आधारे NDLEA च्या पथकाने जहाजाची झडती घेतली असता, हॅच क्रमांक ३ मध्ये कोकेनचा मोठा साठा लपवलेला आढळला.
भारतीय खलाशांवर कारवाई
NDLEA चे प्रवक्ते फेमी बबाफेमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये जहाजाचे मास्टर (कॅप्टन) शर्मा शशी भूषण यांच्यासह २१ अन्य भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निलेश भालराव, मनोज कुमार भारती, अँथनी डेविड अशा विविध नावांचा यात उल्लेख आहे. या सर्वांना सध्या कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
नायजेरिया: तस्करीचे केंद्र?
नायजेरिया हा देश गेल्या अनेक काळापासून युरोप आणि आफ्रिकन देशांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमुख केंद्र बनला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येही याच बंदरावर २० फिलिपिनो खलाशांना २० किलो कोकेनसह अटक करण्यात आली होती. सध्याची कारवाई ही एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा भाग असल्याचे बोलले जात आहे. यासाठी अमेरिका आणि ब्रिटनच्या तपास यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.
कायदेशीर अडचण आणि भारतीयांची चिंता
परदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली भारतीय खलाशांना अटक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे खलाशी तस्करीमध्ये जाणीवपूर्वक सामील होते की त्यांना फसवले गेले, याचा तपास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जाईल.