मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:22 IST2025-12-30T08:21:43+5:302025-12-30T08:22:34+5:30
Putin residence drone attack: शांतता करार अंतिम टप्प्यात असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले असतानाच रशियामध्ये एक मोठी घटना घडली आहे. युक्रेनने थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाच मारण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्हगोरोड येथील शासकीय निवासस्थानावर थोडे थोडके नव्हे तर ९१ लांब पल्ल्याच्या ड्रोननी हल्ला केल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "आज सकाळी स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हे अजिबात चांगले नाही. युद्धाच्या मैदानात लढणे एक गोष्ट आहे, पण थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करणे ही वेगळी गोष्ट आहे. मी या घटनेमुळे खूप संतापलो आहे." ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ही वेळ अशा प्रकारच्या हल्ल्यांची नाही, कारण आपण शांतता कराराच्या अगदी जवळ आहोत.
दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "रशिया शांतता प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी आणि युक्रेनवर मोठे हल्ले करण्यासाठी हे बनाव रचत आहे," असे झेलेन्स्की म्हणाले. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, पुतिन यांच्या निवासावर तब्बल ९१ ड्रोन डागण्यात आले होते आणि या घटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
शांतता करारावर प्रश्नचिन्ह?
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील यशस्वी भेटीनंतर काही तासांतच हा फोन कॉल आणि हल्ल्याचा आरोप समोर आल्याने आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत खळबळ उडाली आहे. रशियाने आता या घटनेमुळे वाटाघाटींची आपली भूमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे युद्धाचा हा वणवा अधिकच भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.