पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:05 IST2025-07-02T10:04:22+5:302025-07-02T10:05:29+5:30
QUAD Foreign Minister Meeting Update: काही दिवसांपूर्वी झालेल्या शांघाई सहकार्य परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्याबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर आता अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमधून भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का
एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शांघाई सहकार्य परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्याबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर आता अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमधून भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. क्वाडच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एका सुरात निषेध करण्यात आला. तसेच हा हल्ला निंदनीय असल्याचे चारही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
क्वाडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, क्वाड संघटना दहशतवाद आणि हिंसा ज्यामध्ये सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचाही समावेश होतो, अशा दहशतवादाच्या सर्व प्रारूपांचं निषेध करते. तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली कटिबद्धता व्यक्त करते. आम्ही २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र शब्दात निषेध करतो.
क्वाडच्या या संयुक्त निवेदनात पुढे म्हटलं आहे की, आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो. तसेच या हल्ल्यात जखमी जालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी प्रार्थना करतो. या निंदनीय कृत्यामागे असलेले सूत्रधार आणि आरोपी यांना त्वरित कायद्यासमोर आणण्याची मागणी करतो, असेही क्वाडच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
क्वाडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या चार देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी १ जुलै रोजी वॉशिंग्टन येथे चर्चा केली. यादरम्यान, आम्ही अधिक खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत आपली कटिबद्धता व्यक्त केली. आम्ही कायदे, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेबाबत कटिबद्धता व्यक्त केली आहे.