अमेरिकेला मोठा धक्का! स्पेनने इराण युद्धासाठी आपले आकाश केले बंद; अमेरिकन लढाऊ विमानांना लांबचा वळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:53 IST2026-03-30T16:52:27+5:302026-03-30T16:53:27+5:30
Spain closes airspace to US planes :

अमेरिकेला मोठा धक्का! स्पेनने इराण युद्धासाठी आपले आकाश केले बंद; अमेरिकन लढाऊ विमानांना लांबचा वळसा
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील नाटो सदस्य देश असलेल्या स्पेनने अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. इराणवरील हल्ल्यात सामील असलेल्या अमेरिकन विमानांसाठी स्पेनने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गरीटा रोबल्स यांनी सोमवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
स्पेनने यापूर्वीच अमेरिकेला त्यांच्या देशातील संयुक्त लष्करी तळांचा Rota आणि Moron Air Bases वापर करण्यास मनाई केली होती. आता हवाई क्षेत्रही बंद केल्यामुळे अमेरिकेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संरक्षण मंत्री रोबल्स म्हणाल्या, "आम्ही इराणमधील युद्धाशी संबंधित कोणत्याही कारवाईसाठी आमच्या सैन्य तळांचा किंवा हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी देत नाही."
लॉजिस्टिक आणि उड्डाण मार्गांवर परिणाम
स्पेनमधील आघाडीचे वृत्तपत्र 'एल पाईस'ने दिलेल्या वृत्तानुसार, या बंदीमुळे अमेरिकेच्या बी-५२ सारख्या मोठ्या बॉम्बर विमानांना मध्य-पूर्वेतील लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आता लांबचा आणि खर्चिक वळसा घालावा लागत आहे. ब्रिटन किंवा फ्रान्समधून उड्डाण करणाऱ्या विमानांनाही स्पेनच्या आकाशातून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ 'आणीबाणीच्या परिस्थितीत' विमान उतरवण्यास सवलत दिली जाईल.
स्पेनचे युद्धाला विरोध दर्शवणारे धोरण
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या युद्धाला 'बेकायदेशीर' आणि 'अन्यायकारक' म्हटले आहे. स्पेनच्या अर्थव्यवस्था मंत्र्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून एकतर्फी सुरू केलेल्या या युद्धात स्पेन कोणताही सहभाग किंवा योगदान देणार नाही. या निर्णयामुळे अमेरिका आणि स्पेनमधील राजनैतिक संबंध ताणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.