भारतीयांसाठी भूताननं केली मोठी घोषणा, ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार; मोठा फायदा होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 15:22 IST2023-02-27T15:19:39+5:302023-02-27T15:22:06+5:30
भूताननं पर्यटनाला चालना देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय पर्यटकांना होणार आहे.

भारतीयांसाठी भूताननं केली मोठी घोषणा, ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार; मोठा फायदा होणार!
नवी दिल्ली-
भूताननं पर्यटनाला चालना देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय पर्यटकांना होणार आहे. भूतानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता भूतानमध्ये ड्यूटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. जे पर्यटक विकास शुल्क भरतात ते भूतानच्या फुटशोलिंग आणि थिम्पू येथून ड्यूटी फ्री सोनं खरेदी करू शकतात.
भूतानच्या पर्यटनाला जाणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय पर्यटकांसाठी भूतान सरकारनं मोठी घोषणा केली. जेणेकरुन भारतीय पर्यटकांना जास्त फायदा घेता येईल.
भूतानचं सरकारी वृत्तपत्र Kuensel च्या वृत्तानुसार भूतान सरकारनं हा निर्णय २१ फेब्रुवारी रोजी भूतानच्या नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. रिपोर्टनुसार सर्व एसडीएफ पेमेंट करणारे सर्व भारतीय पर्यटक सोनं खरेदी करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यांना पर्यटन विभागामार्फत निर्धारित हॉटेल्समध्ये कमीत कमी एक रात्रीसाठी राहणं गरजेचं असणार आहे. तसंच सोनं १ मार्चपासून थिम्फू आणि फुंटशोलिंग येथून खरेदी करता येणार आहे.
द वायरच्या वृत्तानुसार, सोनं ड्युटी-फ्री अशा आऊटलेट्सकडून विक्री केलं जातं जे सामान्यत: लग्झरी आयटम्ससाठी ओळखले जातात आणि भूतानच्या अर्थमंत्रालयाअंतर्गत येतात. आता पर्यटनाला चालना देण्यासाठी आता हेच आऊटलेट्स ड्युटी फ्री सोनं खरेदीवर कोणताही लाभ मिळवू शकणार नाहीत.
२६ फेब्रुवारीच्या नव्या किमतीनुसार भारतात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,३९० रुपये इतकी आहे. तर भूतानमध्ये हिच किंमत ४०,२८६ बीटीएन (भूतान चलन) इतकी आहे. एक रुपया आणि एक बीटीएनचं मुल्य जवळपास समान आहे. म्हणजेच भारतीयांना भूतानमध्ये १० ग्रॅम सोनं ४०,२८६ रुपयांना खरेदी करता येणार आहे. पण याचा लाभ घेण्यासाठी भारतीय पर्यटाकांना विकास शुल्काच्या स्वरुपात प्रतिदिन १,२०० रुपये भरावे लागणार आहेत. तसंच पर्यटकाला भूतानच्या पर्यटन विभागाद्वारे प्रमाणित असलेल्या हॉटेलमध्ये कमीत कमी एक रात्र राहावं लागणार आहे.