खबरदार, मुलांना संगीत, नृत्य शिकवाल तर! बांगलादेशात कलाशिक्षण बंद करून धार्मिक शिक्षणावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 07:25 IST2025-09-23T07:24:26+5:302025-09-23T07:25:04+5:30

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकारही या दबावाला बळी पडताना दिसत आहे. यावरून जगभरातून बांगलादेशवर टीकाही होत आहे. 

Beware, if you teach music and dance to children! Bangladesh to stop art education and focus on religious education | खबरदार, मुलांना संगीत, नृत्य शिकवाल तर! बांगलादेशात कलाशिक्षण बंद करून धार्मिक शिक्षणावर भर

खबरदार, मुलांना संगीत, नृत्य शिकवाल तर! बांगलादेशात कलाशिक्षण बंद करून धार्मिक शिक्षणावर भर

संगीत, नृत्य, कला, भाषा हा कोणत्याही देशाचा सांस्कृतिक कणा. ज्या देशात कल, संगीताला प्रोत्साहन दिलं जातं, जिथे कलेची संस्कृती रुजते तो देश अधिक सुसंस्कृत असतो, तिथल्या नव्या पिढीवरही चांगले संस्कार घडतात, हा इतिहास आहे; पण अनेक देश हा इतिहास मोडीत काढायला निघाले आहेत. यात अलीकडचं नाव आहे ते म्हणजे बांगलादेश. ज्या बांगलादेशाची निर्मितीच कला, संस्कृती, भाषा या कारणानं झाली, त्याच बांगलादेशात आता कला आणि संस्कृतीला हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

बांगलादेशातील पारंपरिक कट्टरपंथीयांकडून आता सरकारला धमक्या दिल्या जात आहेत, ‘खबरदार जर शाळांमध्ये मुलांना संगीत आणि नृत्य शिकवलं तर... शाळांमध्ये शिकवले जाणारे हे विषय तातडीनं बंद करा आणि विद्यार्थ्यांवर, मुलांवर होणारे ‘कुसंस्कार’ही. अशानं ही पिढी बरबाद होईल आणि देशाचंही वाटोळं होईल.’ 

यासाठी बांगलादेशातील कट्टरपंधी संघटना एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, शाळांमध्ये जे जे शिक्षक संगीत, नृत्य, कला शिकवताहेत, त्यांना ताबडतोब काढून टाका आणि त्यांच्याऐवजी धार्मिक शिक्षण देणाऱ्या जाणकारांची तिथे नियुक्ती करा. जमात-ए-इस्लामी या संघटनेचे महासचिव मिया गुलाम परवार यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं आहे, संगीत किंवा नृत्य हे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषय मानता येत नाही. जर एखाद्या कुटुंबाला अशा गोष्टींमध्ये रस असेल, तर त्यांनी खासगी शिक्षकांची व्यवस्था करावी आणि मुलांना शिकवावं; पण शाळेत मुलांना असे शिक्षण देऊन देशाला पाश्चात्त्य देशांच्या गळ्यातलं बाहुलं बनवू नये. केवळ धार्मिक शिक्षणच येणाऱ्या पिढीला प्रामाणिक अन् जबाबदार नागरिक बनवेल.

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकारही या दबावाला बळी पडताना दिसत आहे. यावरून जगभरातून बांगलादेशवर टीकाही होत आहे. 
संगीताचा मोठा वारसा, नृत्य, अभिनय, विविध कला आणि शिक्षण हीच बांगलादेशची आधीची ओळख होती. याच कारणानं पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती. बंगालमधील लोकांना वाटत होतं की, पाकिस्तानी नेते जबरदस्तीने त्यांच्यावर उर्दू लादत आहेत आणि त्यांची संस्कृती मोडून काढत आहेत. पूर्व पाकिस्तानातील (बंगाल) लोकांची भाषा बंगाली होती; पण पाकिस्तान सरकारनं (पश्चिम पाकिस्तान) जबरदस्तीनं उर्दू ही राष्ट्रभाषा ठरवली आणि बंगाली लोक पेटून उठले. त्यातूनच बांगलादेशच्या निर्मितीला खतपाणी मिळालं होतं; पण मोहम्मद युनूस यांच्या सत्तेच्या काळात बांगलादेश अधिकाधिक असहिष्णू आणि कट्टरपंथी होताना दिसतो आहे; कारण प्रतिगामी शक्ती तिथे दिवसेंदिवस डोके वर काढू लागल्या आहेत. खरे तर बांगलादेशातील बहुसंख्य लोकांना आणि पालकांनाही ही अरेरावी मान्य नाही, त्यांना आपल्या मुलांना शिकवायचंय, कला आणि संगीतात आपल्या मुलांनी रुची दाखवावी, असं त्यांना वाटतंय; पण त्यांच्या मतांना तिथे काडीचीही किंमत नाही. मुलांचं कलाशिक्षण बंद करून धार्मिक शिक्षणावर भर देणं हा फक्त शिक्षण व्यवस्थेवर हल्ला नाही, तर बांगलादेशच्या बहुसांस्कृतिक न् बहुधार्मिक पायाभूत रचनेलाही मोठा धक्का आणि धोका आहे.

Web Title: Beware, if you teach music and dance to children! Bangladesh to stop art education and focus on religious education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.