'खबरदार! चीनसोबत डील केली, तर १०० टक्के टॅरिफ लावू', डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्या देशाला दिली धमकी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 21:44 IST2026-01-24T21:43:01+5:302026-01-24T21:44:33+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगातील कोणत्याही देशाला घाबरवण्यासाठी टॅरिफ अस्त्र उगारण्याची भीती दाखवत आहेत. आता आणखी एका देशाला त्यांनी अशीच धमकी दिली आहे.

'खबरदार! चीनसोबत डील केली, तर १०० टक्के टॅरिफ लावू', डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्या देशाला दिली धमकी?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी कॅनडाला 'टॅरिफ अस्त्र' दाखवले. कॅनडाने जर चीनसोबत व्यापार करार केला, तर अमेरिका कॅनडातून येणाऱ्या सर्वच सामानावर १०० टक्के टॅरिफ लावेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दलचा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, "जर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना असे वाटत असेल की, ते कॅनडाला चीनसाठी ड्रॉप ऑफ पोर्ट बनवतील, जिथून चीन अमेरिकेमध्ये सामान आणि वस्तू पाठवेल, तर मग कॅनडा खूप मोठी चूक करत आहेत."
'सामान आणि वस्तूंवर तात्काळ शंभर टक्के टॅरिफ लावू'
ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, "जर कॅनडाने चीनसोबत करार केला, तर अमेरिका कॅनडातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामानावर आणि वस्तूंवर तात्काळ १०० टक्के टॅरिफ लावेल", अशी धमकी त्यांनी दिली.
चीन एका वर्षातच गिळंकृत करेल
अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारीही ग्रीनलँडच्या संदर्भात प्रस्तावित असलेल्या गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स प्रोजेक्टला नकार दिल्याबद्दल कॅनडाला इशारा दिला होता. ट्रम्प म्हणाले होते की, 'चीन एका वर्षात तुम्हाला गिळंकृत करेल. अमेरिकेच्या मदतीने सुरक्षा उपाययोजनांऐवजी चीनसोबत संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर कॅनडावर जोर देत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
"कॅनडा, ग्रीनलँडवर गोल्डन डोम तयार करण्याच्या प्रोजेक्टचा विरोध करत आहे. पण गोल्डन डोम उलट कॅनडाचेच संरक्षण करेल. त्याऐवजी त्यांना चीनसोबत व्यापार करण्याच्या बाजूने मतदान केले. चीन तर त्यांना एका वर्षातच गिळेल", असे ट्रम्प म्हणाले होते.