पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठविणार मंगळाची उत्तमोत्तम छायाचित्रे; जीवसृष्टीचे गूढ उकलण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 02:01 IST2021-02-21T02:00:54+5:302021-02-21T02:01:05+5:30
नासाची संशोधन भरारी; जीवसृष्टीचे गूढ उकलण्याचे प्रयत्न

पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठविणार मंगळाची उत्तमोत्तम छायाचित्रे; जीवसृष्टीचे गूढ उकलण्याचे प्रयत्न
वॉशिंग्टन : मंगळाच्या पृष्ठभागावर केबलच्या साहाय्याने पर्सिव्हियरन्स रोव्हर उतरवितानाचे काढलेले छायाचित्र नासाने शुक्रवारी जारी केले. अशा प्रकारचे छायाचित्र मंगळावर प्रथमच काढण्यात आले आहे. मंगळावरील यापेक्षाही अधिक उत्तम छायाचित्रे आगामी काळात पाहायला मिळतील, असे नासाने म्हटले आहे. मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर घेऊन जाणाऱ्या अंतराळयानातील कॅमेऱ्यातून जमिनीपासून सहा फूट उंचीवरून हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. त्यासाठी या अंतराळयानाला आपला वेग ताशी २.७ किमीपर्यंत कमी करावा लागला.
पर्सिव्हियरन्स रोव्हर मंगळावरील जेझेरो क्रेटर या अत्यंत दुर्गम भागात उतरविण्यात आले आहे. तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी एक नदी व तलाव असावा असे रोव्हरने त्या भागाच्या काढलेल्या छायाचित्रांवरून लक्षात येते. तेथील खडकांचे आयुष्यमान ३.६ अब्ज वर्षे असावे असे शास्त्रज्ञांचे अनुमान आहेत. हे खडक ज्वालामुखीच्या विस्फोटातून निर्माण झाले आहेत का, या प्रश्नाचाही आम्ही शोध घेत आहोत, असे नासाचे शास्त्रज्ञ केटी स्टॅक मॉरगन यांनी म्हटले आहे.
पर्सिव्हियरन्स रोव्हरने मंगळावर उतरल्यानंतर पाठविलेली पहिली छायाचित्रे कृष्णधवल होती. ही छायाचित्रे कमी रेझ्युलेशनची होती. (वृत्तसंस्था)