बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय: नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार केल्याप्रकरणी शेख हसीना दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:11 IST2025-11-17T14:10:54+5:302025-11-17T14:11:16+5:30
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठा निर्णय दिला आहे.

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय: नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार केल्याप्रकरणी शेख हसीना दोषी
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने शेख हसीना यांना जुलै महिन्यात झालेल्या दडपशाहीत निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे.
बांगलादेशी माध्यम 'प्रथम आलो'नुसार, कोर्टाने हा निर्णय देताना हसीना यांची एक ऑडिओ क्लिप देखील जाहीर केली, जी बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये हसीना पोलीस प्रमुखांना लोकांवर गोळ्या चालवण्यास सांगत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोर्टाने आपला निर्णय देताना मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचा देखील उल्लेख केला.
हसीना यांच्याविरोधात ४५८ पानांचा निकाल
या प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी शेख हसीनाच दोषी होत्या, हे कोर्टाने मान्य केले आहे. फिर्यादी पक्षाने सादर केलेले पुरावेही कोर्टाने लोकांसमोर ठेवले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे.
या निकालात म्हटले आहे की, हसीना जानेवारी २०२४च्या निवडणुकीनंतरच हुकूमशाह बनण्याच्या मार्गावर होत्या. त्यांनी जानेवारी २०२४च्या निवडणुकीत विरोधी पक्षाला चिरडले. यानंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले गेले.
हसीना कशा अडकल्या?
या हत्या प्रकरणात बांगलादेश सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी बनवले.
आंतरराष्ट्रीय कोर्टात या तिघांविरुद्ध खटला सुरू असताना, माजी पोलीस महानिरीक्षक अल-मामून माफीचे साक्षीदार बनले. अल-मामून यांनी हसीना यांच्या विरोधात साक्ष देण्याचे मान्य केले. याच दरम्यान, हसीना यांचा एक ऑडिओ समोर आला, ज्यात त्या पोलीस प्रमुखांशी बोलत होत्या. या ऑडिओची सत्यता सिद्ध होताच हसीना यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी वेगाने सुरू झाली आणि कोर्टाने त्यांना दोषी ठरवले.