शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:06 IST2026-03-28T09:03:18+5:302026-03-28T09:06:57+5:30

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवा अध्याय! ५६ व्या स्वातंत्र्यदिनी बांगलादेशने भारताला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान तारीख रहमान यांच्या नेतृत्वात दोन्ही देश मैत्रीचा नवा हात पुढे करत आहेत.

"Bangladesh will never act against India's security interests": High Commissioner Riaz Hamidullah assures New Delhi | शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द

शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द

बांगलादेशच्या ५६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ढाकाने भारताला मैत्रीचा आणि सुरक्षेचा मोठा शब्द दिला आहे. "बांगलादेश कधीही असे पाऊल उचलणार नाही, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला किंवा हिताला बाधा येईल. दोन्ही देशांनी भविष्यातील संबंधांबाबत पूर्णपणे निश्चिंत राहावे," अशी ग्वाही भारतातातील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हामिदुल्ला यांनी दिली आहे.

मैत्रीचं नवं पर्व: तारीख रहमान यांचा सकारात्मक संदेश

बांगलादेशात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, बांगलादेशचे नवनियुक्त पंतप्रधान तारीख रहमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या संदेशाने सर्व शंका दूर केल्या आहेत. उच्चायुक्त हामिदुल्ला यांच्या मते, हा संदेश दोन्ही देशांमधील आगामी काळातील संबंधांची दिशा स्पष्ट करणारा आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये आता विश्वासाचे एक नवीन वातावरण निर्माण होत आहे.

अस्थिरतेची भीती बाळगणाऱ्यांना चपराक

बांगलादेशातील निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना हामिदुल्ला म्हणाले की, "देशात १९ दिवस शांततेत निवडणुका पार पडल्या. भारतीय पत्रकारांनी स्वतः तेथील जमिनी परिस्थिती पाहिली आहे. निवडणुकीला महिना उलटून गेला असून बांगलादेशात पूर्णपणे स्थिरता आहे. जे लोक देश अस्थिर होण्याची भीती व्यक्त करत होते, ते आता खोटे ठरले आहेत." बांगलादेश हा एक मुक्त समाज असून तिथे सार्वजनिक चर्चा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भूतकाळातील मतभेद विसरण्याची वेळ

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता तारीख रहमान यांच्या नेतृत्वात हे नाते पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "आम्ही सतत भूतकाळाकडे पाहून पुढे जाऊ शकत नाही. आधी काय झाले, याचाच विचार करत बसलो तर प्रगती खुंटेल. त्यामुळे दोन्ही देशांनी आता भविष्यातील संधींकडे लक्ष दिले पाहिजे," असे आवाहन उच्चायुक्तांनी यावेळी केले.

Web Title: "Bangladesh will never act against India's security interests": High Commissioner Riaz Hamidullah assures New Delhi