बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:32 IST2025-10-09T16:32:11+5:302025-10-09T16:32:38+5:30
bangladesh china 20 fighter jets deal: या डीलमुळे दक्षिण आशियातील सामरिक परिस्थितीत मोठा बदल घडू शकेल

बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
bangladesh china 20 fighter jets deal: भारताचा शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशलाहीचीनची भुरळ पडत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत, बांगलादेशच्या हंगामी मोहम्मद युनूस सरकारने चीनकडून २० लढाऊ विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या सौद्याची अंदाजे किंमत २.२ अब्ज डॉलर इतकी असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये विमाने, प्रशिक्षण, देखभाल आणि इतर संबंधित खर्च यांचा समावेश आहे. हंगामी सरकारच्या अधिकारी व सल्लागारांनी या खरेदीचे तपशील सार्वजनिक करण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे.
बांगलादेश एअर फोर्सचे वरिष्ठ अधिकारी एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांनी सांगितले की, या प्रस्तावाला हंगामी सरकारने प्राथमिक मान्यता दिली आहे आणि आता एका मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांच्या एका अंतर्गत समितीमार्फत अंतिम टप्प्यात प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही विमाने चीनच्या Chengdu J-10CE मॉडेलची असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बांगलादेशची लढाऊ क्षमता आणि नवे हवाई संरक्षण जलदगतीने साध्य करण्यासाठी या विमानांची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे.
हा निर्णय बांगलादेशच्या Forces Goal 2030 या लष्करी आधुनिकीकरण योजनेचा भाग आहे. या मोहिमेचा उद्देश देशाची सुरक्षा क्षमता विविध स्तरांवर वाढवणे असा आहे. हा सौदा पूर्ण झाला तर तो बांगलादेशच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाचा विमान खरेदी करार ठरून शकेल. तसेच दक्षिण आशियातील सामरिक परिस्थितीत यामुळे मोठा बदल घडू शकेल.
स्थानिक सरकारी सल्लागार आसिफ महमूद यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकार २०२५-२६ आणि २०२६-२७ आर्थिक वर्षात ही लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखत आहे. पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ही विमाने थेट चीनकडून किंवा G2G (सरकार-ते-सरकार) कराराद्वारे खरेदी केली जातील. ही घोषणा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेक तज्ज्ञांनी या 'टायमिंग'बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.