भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:37 IST2025-12-21T09:35:06+5:302025-12-21T09:37:05+5:30
बांगलादेशात एका हिंदू तरुणासोबत भयंकर घटना घडली. मॉब लिंचिंग प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

फोटो - आजतक
बांगलादेशात एका हिंदू तरुणासोबत भयंकर घटना घडली. मॉब लिंचिंग प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या भयंकर गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही असं म्हटलं आहे.
गुरुवारी मयमनसिंह जिल्ह्यातील बलुका परिसरात ही धक्कादायक घटना घडली. २५ वर्षीय दीपू चंद्र दास या कपड्याच्या फॅक्ट्रीतील कामगाराला जमावाने आरोपाखाली मारहाण करून ठार मारलं. त्यानंतर त्याला जाळून टाकण्यात आलं.
मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन जारी केलं, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, अटक केलेल्या १० पैकी सात जणांना रॅपिड एक्शन बटालियन (RAB) ने अटक केली आहे, तर तीन जणांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. ते म्हणाले की RAB आणि पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून या व्यक्तींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी १९ ते ४६ वर्षांच्या दरम्यान असल्याचं वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, दिपू चंद्र दासला एका कारखान्याबाहेर जमावाने सर्वात आधी मारहाण केली आणि नंतर झाडाला लटकवलं. जमावाने नंतर ढाका-मयमनसिंह महामार्गाच्या बाजूला सोडलं आणि काही वेळाने जाळून मारलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो मयमनसिंह मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला, जिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं.
अंतरिम सरकारने लिंचिंगचा तीव्र निषेध केला आणि म्हटलं की, नवीन बांगलादेशात अशा हिंसाचाराला कोणतीही जागा नाही. सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या घृणास्पद गुन्ह्यातील गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. बांगलादेशात हिंदू समुदायासह अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक भयंकर घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे देशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.