निवडणुकीआधी जाग आली! कट्टरवाद्यांनी जिवंत जाळलेल्या हिंदू तरुण दीपू दासच्या कुटुंबाला बांगलादेश सरकार मदत करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:52 IST2026-02-11T19:51:26+5:302026-02-11T19:52:12+5:30
बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात कट्टरवाद्यांच्या जमावाने निर्घृण हत्या केलेल्या दीपू चंद्र दास या हिंदू अल्पसंख्याक तरुणाच्या कुटुंबाला अखेर अंतरिम सरकारने मदतीचा हात दिला आहे.

निवडणुकीआधी जाग आली! कट्टरवाद्यांनी जिवंत जाळलेल्या हिंदू तरुण दीपू दासच्या कुटुंबाला बांगलादेश सरकार मदत करणार
बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात कट्टरवाद्यांच्या जमावाने निर्घृण हत्या केलेल्या दीपू चंद्र दास या हिंदू अल्पसंख्याक तरुणाच्या कुटुंबाला अखेर अंतरिम सरकारने मदतीचा हात दिला आहे. हत्येनंतर दोन महिन्यांनी आणि देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या अवघ्या दोन दिवस आधी मोहम्मद युनूस सरकारने दीपूच्या कुटुंबाला २५ लाख टाका नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
काय आहे मदतीचे स्वरूप?
दीपू दास हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या निधनानंतर उघड्यावर आलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कुटुंबाला हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी २५ लाख टाका इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. दीपूचे वडील आणि पत्नीला १० लाख टाकांची रोख रक्कम दिली जाईल. दिपूच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ५ लाखांची मुदत ठेव केली जाणार आहे.
'ही हत्या देशासाठी लाजिरवाणी'
बांगलादेशचे शिक्षण सल्लागार डॉ. सीआर अबरार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "दीपू दासची हत्या हा एक मोठा अपराध असून समाजाला काळीमा फासणारी ही घटना आहे. सरकारी मदत कोणाचा जीव परत आणू शकत नाही, पण पीडित कुटुंबाला न्याय मिळेल याची खात्री आम्ही देतो. जातीय द्वेषामुळे झालेली ही हत्या संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे," असे अबरार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
१८ डिसेंबरची ती काळरात्र...
१८ डिसेंबर २०२५ रोजी मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात दीपू दासची अत्यंत अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती. कट्टरपंथीयांच्या जमावाने दीपूवर आक्षेपार्ह टिप्पणीचा खोटा आरोप केला होता. त्याला बेदम मारहाण केल्यानंतर एका झाडाला लटकवून जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त झाला होता.
हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दीपू दासच्या हत्येनंतर बांगलादेशातील हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारत सरकारनेही या घटनेचा निषेध करत बांगलादेश सरकारकडे अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी केली होती. निवडणुकांच्या तोंडावर जाहीर झालेली ही मदत पीडित कुटुंबाला किती न्याय मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.