'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:18 IST2025-10-06T10:15:57+5:302025-10-06T10:18:07+5:30
बांगलादेश सैन्याने हिल्सा प्रजनन काळात त्यांच्या सुरक्षेसाठी ४ ते २५ ऑक्टोबर या तीन आठवड्यासाठी मासे पकडण्यावर निर्बंध आणले आहेत

'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
बांगलादेशाने त्यांच्या सागरी क्षेत्रात युद्धनौका आणि गस्ती घालण्यासाठी हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने बहुमूल्य हिल्सा प्रजातीच्या माशांना वाचवण्यासाठी त्यांचं सैन्य दल उतरवलं आहे. हिल्सा यांच्या प्रजनन काळात बेकायदेशीरपणे मासे पकडण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हिल्सा मासे दरवर्षी अंडी देण्यासाठी बंगालच्या खाडीतून नद्यांमध्ये परततात. हेरिंगसारखे दिसणारे हिल्सा मासे बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा आहे. या माशाला भारतातील पश्चिम बंगालमधील लोक खाण्यासाठी खूप पसंत करतात.
बांगलादेश सैन्याने हिल्सा प्रजनन काळात त्यांच्या सुरक्षेसाठी ४ ते २५ ऑक्टोबर या तीन आठवड्यासाठी मासे पकडण्यावर निर्बंध आणले आहेत. हिल्सा माशांच्या सुरक्षेसाठी नौदलाच्या १७ युद्धनौका आणि गस्तीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. परंतु बांगलादेशातील नौदलाकडून सागरी क्षेत्रात वाढवलेल्या गस्तीमुळे भारताचं टेन्शन वाढले आहे.
हिल्सा माशाची किंमत काय असते?
बांगलादेशात कोट्यवधी लोक हिल्सा माशावर अवलंबून असतात. या माशाची किंमत ढाका येथे २२०० टाका म्हणजे १८.४० अमेरिकन डॉलर प्रतिकिलो इतकी आहे. या माशाच्या संरक्षणासाठी युद्धनौका आणि हेलिकॉप्टर्स बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी २४ तास देखरेख ठेवणार आहे असं बांगलादेशी सैन्याने सांगितले. भारतीय मच्छिमार गंगा नदी आणि त्याच्या विशाल त्रिभुज प्रदेशाच्या खाऱ्या पाण्यात मासेमारी करतात. ज्यातून कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या १० कोटी लोकांची मागणी पूर्ण होते. जर या मच्छिमारांनी हिल्सा मासे प्रजननापूर्वीच पकडले तर हळूहळू आपल्या राष्ट्रीय माशावर संकट येईल अशी चिंता बांगलादेशला सतावत आहे.
दरम्यान, बांगलादेश सरकारने प्रजनन काळात मच्छिमारांवर मासे पकडण्यास निर्बंध लावले आहेत. त्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक मच्छिमार कुटुंबाला २५ किलो तांदूळ वाटप केले जाईल. मात्र सरकारची ही मदत पुरेशी नाही असं मच्छिमार कुटुंबाचं म्हणणं आहे. हे ३ आठवडे मच्छिमारांसाठी खूप कठीण असतात, कारण आमच्याकडे जीवित राहण्यासाठी अन्य कुठलेही साधन नाही असं मच्छिमार सत्तार माझी यांनी म्हटलं.