बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 21:49 IST2025-10-19T21:47:59+5:302025-10-19T21:49:52+5:30
लालमोनिरहाट हवाई तळाला राष्ट्रीय गरजांनुसार तयार करण्यात येईल. यामध्ये विमान वाहतूक आणि एअरबेस विद्यापीठाचा समावेश आहे असं बांगलादेश लष्कराने म्हटलं होते. या बेसच्या बांधकामात चीनचा सहभाग आहे असं बोलले जाते.

बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
ढाका - बांगलादेश लालमोनिरहाट एअरबेसमध्ये एक भव्य हँगर बांधत आहे. या हँगरचा वापर लढाऊ विमाने पार्क करण्यासाठी केला जाऊ शकतो. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उझ जमान यांनी या आठवड्यात लालमोनिरहाट एअरबेसला भेट देऊन हँगर बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा बेस सिलिगुडी कॉरिडॉरजवळ आहे, ज्याला भारताचा चिकन नेक म्हणून ओळखले जाते. भारताच्या सीमेलगत असणाऱ्या बेसच्या पुनर्बांधणीत पाकिस्तान आणि चीनचा कथित सहभाग भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
नॉर्थईस्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, लालमोनिरहाट एअरबेसवर बांधकामाधीन असलेल्या हँगरच्या सभोवतालच्या क्षेत्रावर बांगलादेश हवाई दलाचे नियंत्रण आहे. येथे बांधण्यात येणारा हँगर नवीन लढाऊ विमानांसाठी पार्किंग सुविधा असू शकतो, ज्याची बांगलादेश हवाई दल त्यांच्या जुन्या जे-७ विमानांच्या ताफ्याची जागा घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी बांगलादेशात मोहम्मद युनूस सरकार सत्तेत आल्यानंतर या हवाई बेसने केवळ ढाकाच नव्हे तर चीन आणि पाकिस्तानचेही लक्ष वेधून घेतले. लालमोनिरहाट हवाई तळाला राष्ट्रीय गरजांनुसार तयार करण्यात येईल. यामध्ये विमान वाहतूक आणि एअरबेस विद्यापीठाचा समावेश आहे असं बांगलादेश लष्कराने म्हटलं होते. या बेसच्या बांधकामात चीनचा सहभाग आहे असं बोलले जाते.
बांगलादेशने लालमोनिरहाट हवाई तळावर हँगर बांधण्याचे काम देखील लक्ष वेधून घेत आहे कारण ते चीनकडून २.२ अब्ज डॉलर्सच्या करारात २० J-१०CE लढाऊ विमाने खरेदी करण्यावर काम करत आहे. हा करार जवळजवळ अंतिम झाला असल्याचे मानले जाते. बांगलादेशला १६ चिनी JF-१७ खरेदी करण्यातही रस आहे. JF-१७ पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे विकसित केले आहे. लालमोनिरहाट एअरबेसवरील हँगरच्या बांधकामात किमान १०-१२ लढाऊ विमाने बसू शकतात. जनरल जमान यांच्या भेटीनंतर छताचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हँगरचे काम सुरू आहे आणि आता त्याला आणखी गती मिळाली आहे. पुढील पाऊल म्हणजे काँक्रीटची सीमा भिंत बांधणे अपेक्षित आहे असा नॉर्थईस्ट न्यूजचा दावा आहे.
दिर्घकाळापासून ओसाड
बांगलादेशातील हे एअरबेस १,१६६ एकर क्षेत्र व्यापते आणि ४ किलोमीटर लांबीचा रनवे आहे. ते १९३१ मध्ये भारतात ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर १९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने याचा वापर केला. अशा काही घटना वगळता हे एअरबेस वर्षानुवर्षे ओसाड पडले आहे. या हवाई तळाच्या पुनर्विकासात चीनचा सहभाग असल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या तळावर पाकिस्तान आणि चीनची लढाऊ विमाने उभी राहू शकतात. यामुळे चिनी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांची हालचाल वाढू शकते. ज्यामुळे ते भारताविरुद्ध शत्रुत्वाचे केंद्र बनू शकते.