बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. सुशेन चंद्र सरकार (६२ वर्ष) असं व्यापाऱ्याचं नाव असून ते त्रिशालमध्ये 'मेसर्स भाई-भाई एंटरप्रायजेस' नावाने व्यवसाय करत होते. हल्लेखोरांनी हत्येनंतर दुकानातील पैसे (बांगलादेशी चलन) लुटून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बांगलादेशच्या 'आयटीव्ही'ने पोलीस आणि पीडित कुटुंबाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्ह्यातील बोगर बाजार चौकात हल्लेखोरांनी सुशेन सरकार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी दुकानाचे शटर बाहेरून बंद करून पळ काढला. बराच वेळ झाला तरी सुशेन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने मैमनसिंह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सुशेन सरकार यांचा मुलगा सुजान सरकार म्हणाला, "आमचे कोणाशीही वाईट संबंध नव्हते. माझ्या वडिलांची निर्घृण हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी दुकानातील पैसे लुटले आहेत. आमचा तांदळाचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे."
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, "हल्लेखोरांनी रात्री ११ च्या सुमारास सुशेन सरकार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि दुकानाचं शटर बंद करून पसार झाले. कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांना शटर उघडल्यावर सुशेन रक्ताच्या थारोळ्यात दिसले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे."
बांगलादेशात मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारची सत्ता आल्यापासून हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांविरुद्धच्या हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या हिंसाचारामुळे जगभरातून संताप व्यक्त होत असून मानवाधिकार संघटनांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. १२ फेब्रुवारीच्या मतदानापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजात भीतीचं वातावरण आहे.
Web Summary : बांग्लादेश के त्रिशाल, मयमनसिंह में चुनाव से ठीक पहले एक हिंदू व्यापारी, सुशेन चंद्र सरकार की हत्या कर दी गई। हमलावरों ने उसकी दुकान में उस पर हमला किया, पैसे चुरा लिए और भाग गए। मुहम्मद यूनुस के सत्ता में आने के बाद अल्पसंख्यकों के खिलाफ बढ़ती हिंसा के बीच उनके परिवार ने न्याय की मांग की है।
Web Summary : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी त्रिशाल, मैमनसिंह येथे सुशेन चंद्र सरकार या हिंदू व्यावसायिकाची हत्या झाली. हल्लेखोरांनी दुकानात घुसून हल्ला केला, पैसे चोरले आणि पळ काढला. मुहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचारात कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.