बांगलादेश: युतीविरोधात १३ विद्यार्थी नेत्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:49 IST2026-01-04T09:49:04+5:302026-01-04T09:49:04+5:30
गेल्या आठ दिवसांत हे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.

बांगलादेश: युतीविरोधात १३ विद्यार्थी नेत्यांचे राजीनामे
ढाका/नवी दिल्ली :बांगलादेशात फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जमात-ए-इस्लामीसोबत युती केल्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी नेतृत्वाखालील ‘नॅशनल सिटिझन पार्टी’च्या १३ केंद्रीय नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या आठ दिवसांत हे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.
पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून युती करताना तत्त्वांशी तडजोड व राजकीय समझोता करण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या ‘जुलै उठावा’तून एनसीपीचा उदय झाला होता. ही युती जाहीर होण्याआधीच एनसीपीच्या ३० नेत्यांनी हरकती नोंदवल्या होत्या.
हल्ल्यातील जखमी हिंदू व्यापाऱ्याचा मृत्यू
बांगलादेशात तीन दिवसांपूर्वी निर्घृण हल्ल्यात जखमी झालेले हिंदू व्यापारी खोकोनचंद्र दास (५०) यांचा शनिवारी मृत्यू झाला. दास यांच्यावर शरियतपूर जिल्ह्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. नंतर त्यांना पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ढाक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदू समाजातील हा पाचवा मृत्यू आहे.