केळी ३०० तर पपई ४०० रुपये किलो...! रमजानमध्ये पाकिस्तानात फळांना आलाय सोन्याचा भाव; VIDEO बघून डोळे पांढरे होतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:34 IST2026-02-23T16:29:10+5:302026-02-23T16:34:37+5:30
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये सांगण्यात आलेले पाकिस्तानातील फळांचे दर ऐकून कुणाचेही डोळे पांढरे होतील.

केळी ३०० तर पपई ४०० रुपये किलो...! रमजानमध्ये पाकिस्तानात फळांना आलाय सोन्याचा भाव; VIDEO बघून डोळे पांढरे होतील
रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून या महिन्यात जगभरातील मुस्लीम समाजातील लोक रोजा पाळत असतात. या काळात फळांना प्रचंड मागणी असते. मात्र शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या फळांच्या किमती पार आकाश भिडल्या आहेत. खजूर, केळी, पपई आदी फळांना तर अक्षरशः सोन्याचा भाव आला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये सांगण्यात आलेले पाकिस्तानातील फळांचे दर ऐकून कुणाचेही डोळे पांढरे होतील.
भारतीय ब्लॉगर रिझवान याने इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. भारतीय ब्लॉगरने पाकिस्तान भेटीदरम्यान एका फळविक्रेत्याकडे जाऊन फळांचे भाव विचारले. दुकानदाराने केळीच्या तीन जाती दाखवल्या, ज्यांचे दर २०० ते ३०० रुपयांपर्यंत होते. थक्क करणारी गोष्ट म्हणजे, पपईचा दर तब्बल ४०० रुपये किलो एवढा सांगण्यात आला.
यातही सफरचंद आणि खजूरचे दर तर काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. विक्रेत्याने सफरचंदाचा दर ५०० रुपये किलो तर माल्टा (संत्री सदृश फळ)चा दर २५० ते ४५० रुपये किलो एवढा सागितला. रमजानमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या खजूरचा भाव चक्क १२०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. हे सर्व दर पाकिस्तानी चलनातील आहेत.
हा व्हिडिओ 'rizwansidravlog' या पेजवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. "पाकिस्तानी लोक एवढ्या महागाईत कसे जगत असतील?" असा प्रश्न एका युजरने विचारला आहे, तर "आमच्याकडे पपई ४० रुपये किलो आहे," असे म्हणत काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी तर पाकिस्तानातील लोकांना फळांवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला आहे.