पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसरा हल्ला, बलूचिस्तानमध्ये बॉम्बिंग, अनेक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:29 IST2025-03-15T13:28:18+5:302025-03-15T13:29:26+5:30
Pakistan Army under attack: नुकत्याच झालेल्या बॉम्बहल्ल्यात काही जण ठार झाल्याचेही वृत्त

पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसरा हल्ला, बलूचिस्तानमध्ये बॉम्बिंग, अनेक जवान जखमी
Pakistan Army under attack: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत तर अनेक जण ठार झाल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्यावर हा हल्ला केच प्रांतात झाला. हल्लेखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला केला. त्याआधी शुक्रवारी, बलुच सैन्याने पाकिस्तानने ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने म्हटले की, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, पण पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ओलीस ठेवण्यात आलेल्या २१४ सैनिकांना ठार करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा बलुचिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला करण्यात आला.
बलूचिस्तान में 24 घंटे में दूसरी बार पाक सेना पर हमला, कई जवान घायल बलूचिस्तान में 24 घंटे में दूसरी बार पाक सेना पर हमला किया है!#Balochistan#PakistanArmypic.twitter.com/3EmbZ99SaN
— Chandan Jha (@chandan_jha_11) March 15, 2025
पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात काय?
पाकिस्तानी लष्कराने काल एक निवेदन जारी करून म्हटले की, बलुचिस्तानमधील रेल्वे हल्ल्यात ठार झालेल्या २६ ओलिसांपैकी १८ जण सुरक्षा कर्मचारी होते. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लष्कराने कारवाई सुरू करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी २६ ओलिसांना ठार मारले होते. १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, इतर तीन सरकारी अधिकारी आणि पाच नागरिकांचाही त्यात समावेश होता.
३३ दहशतवाद्यांचा खात्मा, ३०० नागरिकांना वाचवण्यात यश
मंगळवारी BLA ने बलुचिस्तानच्या बोलन भागात ४०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर हल्ला केला होता आणि प्रवाशांना ओलीस ठेवले होते. पाकिस्तानी लष्कराने असा दावाही केला आहे की, सुरक्षा दलांनी ३३ दहशतवाद्यांचा खात्मा केला तर ३०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, एकूण ३५४ ओलिसांची सुटका करण्यात आली, ज्यात ३७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे.
ट्रेन 'हायजॅक' कशी झाली?
रोजच्या वेळेपत्रकाप्रमाणे, ११ मार्चला जाफर एक्सप्रेस क्वेट्टाहून पेशावरला रवाना झाली. ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. ही ट्रेन बालोन टेकड्यांमधील एका बोगद्यातून जात असताना, दबा धरून बसलेल्या बलुच सैन्याच्या सैनिकांनी ट्रेन रोखली आणि हायजॅक केली. यात २१ प्रवाशांसह ५८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.