होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 23:51 IST2026-04-08T23:48:30+5:302026-04-08T23:51:28+5:30
Strait of Hormuz Closed: इस्रायलच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
इराण आणि अमेरिकेमध्ये झालेल्या शस्त्रसंधीमुळे होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली होती. तेल-गॅस जहाजांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच इराणने पुन्हा दणका दिला आहे. इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणी सरकारी मीडियाने हे वृत्त दिले आहे. इस्रायलने लेबनानमध्ये हल्ले केल्यानंतर होर्मुझमधून जहाज जाणे बंद झाले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे ही इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीमधील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पण, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ बंद केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी सलग्नित वृत्तसंस्था फार्सने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
बुधवारी (८ एप्रिल) सकाळी इराणच्या परवानगीनंतर दोन तेल जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. पण, त्यानंतर जहाजांची वाहतूक रोखण्यात आली आहे. इस्लामिक रिपब्लिक न्यूज वृत्तसंस्थेनेही जहाजांची वाहतूक थांबली असल्याचे वृत्त दिले आहे. इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
News Alert ! Iran closes the Strait of Hormuz in response to Israeli attacks on Lebanon, Iranian state media reports, according to AP. pic.twitter.com/fyvlUJGnjI
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2026
इराणच्या लष्कराने जहाजांना काय दिला मेसेज?
बीबीसी वृत्तसंस्थेने शिप ब्रोकर एसएसवायच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, खाडीमध्ये असलेल्या जहाजांना इराणच्या आयआरजीसीकडून मेसेज दिला गेला.
या मेसेजमध्ये म्हटले गेले आहे की, "सर्व जहाजांनी या सूचनेकडे लक्ष द्यावे. सर्व जहाजांनी लक्ष द्यावे. फारसच्या खाडीत आणि ओमानच्या खाडीमध्ये असलेल्या सगळ्या जहाजांनी लक्ष द्या. आयआरजीसी नौदल स्टेशनमधून ही सूचना दिली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणे आता बंद आहे आणि होर्मुझ पार करण्यासाठी आधी आयआरजीसीची परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही जहाजे समुद्रात पुढे येण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर हल्ला केला जाईल आणि नष्ट केले जाईल."
जहाजातील कर्मचाऱ्यांनी हा मेसेज रेडिओ चॅनेलवर ऐकला आहे. या रेडिओ चॅनेलचा वापर आंतरराष्ट्रीय समुद्रातील सर्तकेच्या सूचना ऐकण्यासाठी केला जातो.