पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:26 IST2024-12-26T06:26:33+5:302024-12-26T06:26:43+5:30
अझरबैजानच्या विमानाला कझाकिस्तानात भीषण अपघात, ३८हून अधिक लोकांचा मृत्यू

पक्ष्याची धडक, ऑक्सिजन टँकला आग अन् विमान जमिनीवर कोसळले; तासभर लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी
मॉस्को: अझरबैजान एअरलाईन्सचे एक विमान कझाकिस्तानील अक्ताऊ शहरामध्ये बुधवारी सकाळी कोसळून त्यातील ६७ पैकी ३८हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विमानाच्या दोन्ही पायलटचा समावेश आहे. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अझरबैजान एअरलाईन्सचे हे विमान अवताऊ येथे आपत्कालीन स्थितीत उतरविण्याचा पायलटनी प्रयत्न केला. त्यावेळी ते जमिनीवर कोसळून भीषण अपघात घडला. अझरबैजानची राजधानी बाकू येथील रशियातील ग्रोझनी शहराकडे जात असलेल्या या विमानातून अझरबैजानचे ३७, रशियाचे १६, किरगिझस्तानचे ३. कझाकिस्तानचे सहा नागरिक प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याला पक्ष्याने धड़क दिल्याने ते अक्ताऊ शहराच्या विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरविण्याचा निर्णय पायलटने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घेतला.
आग लागलेले विमान उतरवत असताना ते जमिनीवर कोसळले, त्यातून वाचलेल्यांपैकी काही प्रवासी त्या अवशेषांतून बाहेर आले व स्वतःची सुटका करून घेतली असेही काही व्हिडीओंमध्ये पाहायला मिळाले. हे विमान एम्बेअर कंपनीने तयार केले होते. या अपघाताबद्दल सदर कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला तीव्र शोक व्यक्त
अझरबैजान एअरलाइन्सचे म्हटले आहे की, विमान अपघातातील जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर स्थापन झालेल्या विविध देशांच्या संघटनेच्या बैठकीसाठी ते सेंट पीटर्सबर्ग येथे रवाना झाले होते.
विमान अपघाताची बातमी ऐकून ते पुन्हा अझरबैजानमध्ये परत आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही विमान अपघाताबद्दल तीव शोक व्यक्त केला आहे.