ऑस्ट्रेलियात कठोर बंदूक कायदे हवे; पंतप्रधान अल्बानेस यांचा मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:25 IST2025-12-16T13:24:11+5:302025-12-16T13:25:10+5:30
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस यांनी देशात कठोर बंदूक कायदे असावेत, असा प्रस्ताव आपल्या मंत्रिमंडळापुढे ठेवला आहे.

ऑस्ट्रेलियात कठोर बंदूक कायदे हवे; पंतप्रधान अल्बानेस यांचा मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव
सिडनी: शहरातील प्रसिद्ध बॉण्डी बीचवर रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस यांनी देशात कठोर बंदूक कायदे असावेत, असा प्रस्ताव आपल्या मंत्रिमंडळापुढे ठेवला आहे. ज्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे, त्यांच्याकडे मर्यादित बंदुका असाव्यात असा एक प्रस्ताव अल्बानेस यांनी सुचवला आहे.
या संदर्भात सरकार लवकरच संसदेत विधेयक आणण्याचा प्रयत्न करणार आहे. परिस्थिती बदलत असते. लोकांच्या कालानुरूप धारणा बदलत असतात. त्यामुळे बंदुकांच्या नियमातही बदल करण्याची गरज आहे. काही कायदे राज्यांनी बदलायचे आहेत ते बदल करतील, असे अल्बानेस यांनी पत्रकारांना सांगितले. सोमवारी बॉण्डी बीचवर हजारो नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
सुटका झालेल्या वृद्धाचा समावेश
१. रविवारच्या घटनेत मृतांची संख्या १५वर पोहोचली असून, त्यात नाझींच्या छळछावणीतून सुटका झालेल्या ८७ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. तसेच १० वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
२. ज्या व्यक्तीने एका दहशतवादाच्या हातातील बंदूक हुसकावून घेतली त्याचे नाव अहमद अल अहमद आहे. तो फळविक्रेता आहे. त्यालाही दुखापत झाली आहे.
दहशतवाद्यांची नावे उघड: पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची नावे साजिद अक्रम (५०) व नाविद अक्रम (२४) अशी आहेत. यातील साजिद हा पोलिस गोळीबारात ठार झाला, तर नाविदला जखमी अवस्थेत पकडण्यात आले.