Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:25 IST2025-12-10T12:24:05+5:302025-12-10T12:25:44+5:30
Social Media Ban for Under 16: ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे. या देशात आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट आणि किक यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर किंवा त्यावर नवीन अकाउंट तयार करता येणार नाही. काही सोशल मीडिया कंपन्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना ऑनलाईन धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान अल्बानीज यांनी या कायद्याचे समर्थन केले. डिजिटल युगात मुलांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. मुले ऑनलाईन सुरक्षित राहतील, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. सोशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, असा त्यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलिया सरकारने उचललेल्या या पावलाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावर वयोमर्यादा लागू करणारी ही जगातील पहिली मोठी बंदी आहे. हा कायदा इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, यूट्यूब, टिकटॉक, रेडिट आणि एक्स यांसारख्या १० प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना लागू होतो. या सर्व प्लॅटफॉर्मना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी वयोमर्यादा पडताळणीची साधने सक्रिय करावी लागतील.
नवीन कायद्यानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना आता ऑस्ट्रेलियातील १६ वर्षांखालील युजर्सची अकाउंट्स बंद करावी लागतील आणि नवीन अकाउंट्स तयार करण्यापासून रोखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावी लागतील. नियमांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्मना ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर ( २७० कोटींहून अधिक) पर्यंतचा मोठा दंड भरावा लागू शकतो.