पाकिस्तानात अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला, १० ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:02 IST2026-03-02T08:02:24+5:302026-03-02T08:02:42+5:30
अयातुल्ला अली खोमेनेई यांच्या मृत्यूनंतर रविवारी पाकिस्तानातील कराची येथील अमेरिकी वाणिज्य दूतावासाबाहेर पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान १० जणांचा मृत्यू झाला. यात अनेक जण जखमी झाले.

पाकिस्तानात अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला, १० ठार
कराची : इराणवर झालेल्या हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांच्या मृत्यूनंतर रविवारी पाकिस्तानातील कराची येथील अमेरिकी वाणिज्य दूतावासाबाहेर पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान १० जणांचा मृत्यू झाला. यात अनेक जण जखमी झाले.
पोलिसांनुसार, मोठ्या संख्येने निदर्शक वाणिज्य दूतावासाभोवती जमले होते. पोलिसांनी हा जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. यादरम्यान माई कोलाची रोडजवळ झालेल्या गोळीबार आणि संघर्षात सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंझर यांनी कराचीच्या अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकांकडून तात्काळ माहिती मागवली असून कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे बजावले आहे. निदर्शनांच्या वेळी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अनेक भागांत सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
शिया संघटना आक्रमक
शिया संघटनांनी खोमेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ कराचीतील अमेरिकी वाणिज्य दूतावासावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
१९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते राहिलेले खोमेनेई यांचा शनिवारी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांत मृत्यू झाला. याचे पडसाद पाकिस्तानसह अनेक देशांत
उमटत आहेत.