बँकॉक : लंडनहून सिंगापूरला निघालेल्या विमानाला मंगळवारी अचानक आलेल्या वाऱ्याच्या झंझावातामुळे (एअर टर्ब्युलन्स) जोरदार धक्के बसले. त्यामुळे अवघ्या सहा मिनिटांतच विमान ३७ हजार फूटांवरून ३१ हजार फूट उंचीपर्यंत खाली आले. या घटनेत एका ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. त्यानंतर विमानाचे बँकॉक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाला लंडनहून निघाल्यानंतर ११ तासांनी खराब हवामानामुळे वाऱ्याचे तडाखे बसले. विमान कमी उंचीवर आणताना प्रवाशांनी सीट बेल्ट बांधावेत, अशी सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे काही प्रवासी आसनांतून वर उडाले. त्यातील काहीजणांचे डोके लगेज कंटेनरवर आदळले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले. २११ प्रवासी व १८ विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते. मात्र या घटनेनंतर विमान बँकॉक विमानतळावर उतरवताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत विमानातील एका ब्रिटिश नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्या जीवितहानीबद्दल सिंगापूर एअरलाइन्सने तीव्र शोक व्यक्त केला.
असा बसतो एअर टर्ब्युलन्सचा तडाखा -विमानाच्या उड्डाणामध्ये हवेचा प्रवाह महत्त्वाची भूमिका बजावतो. जर या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले तर विमानाला धक्के बसण्यास सुरुवात होते. उड्डाणाच्या मार्गावरून विमान भरकटते. अशा घटनांमध्ये अनेकदा विमान अचानक कमी उंचीवरही येते. या सगळ्या घटनेला अचानक आलेला वाऱ्याचा झंझावात (एअर टर्ब्युलन्स) असेही म्हटले जाते. विमानाला धक्के बसायला लागले व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नसतील तर त्यांचे डोके लगेज केबिनवर आदळणे, प्रवासी आसनावरून खाली पडणे असे प्रकार घडतात. त्यात ते जखमी होतात किंवा एखाद्याचा मृत्यूही होतो.