सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:27 IST2025-11-23T16:21:12+5:302025-11-23T16:27:18+5:30
या नोकरीसाठी पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नसल्याचेही सांगण्यात आले आहे

सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जगाराच्या हजारो नवीन संधींची घोषणा केली आहे. सौदीच्या इस्लामिक व्यवहार, दावा आणि मार्गदर्शन मंत्रालयाने देशातील विविध मशिदींमध्ये तब्बल ३१ हजार नवीन अर्धवेळ नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. विशेषतः इमाम (नमाजचे नेतृत्व करणारे) आणि मौज्जिन (अजान देणारे) या महत्त्वाच्या पदांसाठी ही मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नाही !
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मशिदींमधील सेवांची गुणवत्ता वाढवणे आणि पात्र सौदी नागरिकांना रोजगाराची संधी देणे हा आहे. या नोकऱ्या 'रिवॉर्ड्स सिस्टीम' (Makafaat) अंतर्गत येत असल्याने, अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या पदांवर पूर्णवेळ काम करणे बंधनकारक नाही. यामुळे नागरिक आपली मुख्य नोकरी कायम ठेवून, उर्वरित वेळेत मशिदींमध्ये सेवा देऊ शकतील, अशी लवचिक व्यवस्था मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
३१ हजार जागा, ९१ हजार नोकऱ्या
या ३१ हजार नवीन जागांसह, मंत्रालयाने 'राष्ट्रीय रोजगार उपक्रमा' अंतर्गत एकूण ९१ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. या नोकऱ्यांसाठी अर्जदार सौदी नागरिक असावा, त्याचे वय किमान १८ वर्षे असावे आणि त्याचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. इमाम पदासाठी कुराण पठणात आणि मूलभूत इस्लामिक ज्ञानात कौशल्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने नसून इच्छुकांना मंत्रालयाच्या देशभरातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये जाऊन थेट अर्ज सादर करावा लागणार आहे.