7.7 लाख कोटी खर्च करूनही NASA चे अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:11 IST2026-04-02T18:09:27+5:302026-04-02T18:11:06+5:30
Artemis II Mission: चार अंतराळवीरांना घेऊन नासाचे महत्त्वाकांक्षी आर्टेमिस II मून मिशन यशस्वीरित्या लॉन्च झाले आहे.

7.7 लाख कोटी खर्च करूनही NASA चे अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत; कारण काय?
NASA Artemis II Mission: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) आपले महत्त्वाकांक्षी आर्टेमिस II मून मिशन यशस्वीरित्या लॉन्च केले असून, यातून चार अंतराळवीरांनी फ्लोरिडा येथून अंतराळाकडे उड्डाण केले आहे. सुमारे तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतराळवीरांना या मोहिमेसाठी पाठवण्यात आले आहे. हे 10 दिवसांचा मिशन अनेक कारणांनी महत्त्वाचा मानले जात आहे. विशेष म्हणजे अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारतील, मात्र चंद्रावर उतरणार नाहीत.
चंद्रावर का उतरणार नाही?
या मिशनचा मुख्य उद्देश चंद्रावर उतरणे नसून, भविष्यात चंद्रावर बेस उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रणालींची चाचणी घेणे हा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च झालेल्या आर्टेमिस I मिशनमध्ये रॉकेट आणि मानवरहित कॅप्सूलची चाचणी घेण्यात आली होती. आर्टेमिस II मध्ये SLS रॉकेट आणि ओरियन अंतराळयानातील लाइफ सपोर्ट सिस्टमची चाचणी केली जाणार आहे.
Liftoff.
— NASA (@NASA) April 1, 2026
The Artemis II mission launched from @NASAKennedy at 6:35pm ET (2235 UTC), propelling four astronauts on a journey around the Moon.
Artemis II will pave the way for future Moon landings, as well as the next giant leap — astronauts on Mars. pic.twitter.com/ENQA4RTqAc
नासाच्या माहितीनुसार, या मिशनमुळे अंतराळयानातील सर्व सिस्टम अंतराळवीरांसह डीप स्पेसमध्ये योग्यरीत्या काम करतात का, याची खात्री केली जाईल. या मिशनमधील अनुभवांवर पुढील चंद्र मोहिमांचे नियोजन केले जाणार आहे.
पुढील आर्टेमिस मिशनमध्ये चंद्रावर लँडिंग
नासाच्या दीर्घकालीन योजनेनुसार आर्टेमिस III मिशनमध्ये पृथ्वीच्या कक्षेत डॉकिंग चाचणी केली जाईल, तर 2028 मध्ये होणाऱ्या आर्टेमिस IV मिशनमध्ये अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहेत. मिशन विश्लेषण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मिशनचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे. अंतराळयानाची सुरक्षा, नेव्हिगेशन आणि ऑनबोर्ड सिस्टमची चाचणीही या मिशनमध्ये केली जाणार आहे.
अब्जावधी डॉलरचा खर्च
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2025 पर्यंत आर्टेमिस कार्यक्रमावर सुमारे 93 अब्ज डॉलर्स खर्च झाल्याचा अंदाज आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 7.7 लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. या मिशनला अमेरिकन सरकारकडून निधी मिळतो, म्हणजेच अमेरिकन करदाते यासाठी निधी देतात.
खासगी कंपन्यांची महत्त्वाची भूमिका
या मिशनमध्ये बोईंग, नॉर्थ्रॉप ग्रुमन आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या एरोस्पेस कंपन्यांची महत्त्वाची भूमिका आहे. रॉकेट, अंतराळयान आणि इतर तांत्रिक प्रणालींच्या निर्मितीसाठी या कंपन्यांना सरकारी कंत्राटांद्वारे पैसे दिले जातात. एकूणच, आर्टेमिस II मिशन हे चंद्रावर मानव पाठवण्याच्या आणि भविष्यात चंद्रावर कायमस्वरूपी बेस उभारण्याच्या दीर्घकालीन योजनेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.