काय घडलेय...! ६०,००० मेट्रिक टन एलएनजी अन् ९०० मेट्रिक टन डिझेल घेऊन टँकर समुद्रात फिरतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 08:48 IST2026-03-17T08:48:02+5:302026-03-17T08:48:27+5:30
Arctic Metagaz News: ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचे महाकाय गॅस टँकर भूमध्य समुद्रात लावारिस आहे. ६० हजार टन LNG मुळे मोठ्या सागरी स्फोटाची भीती. वाचा सविस्तर अपडेट.

काय घडलेय...! ६०,००० मेट्रिक टन एलएनजी अन् ९०० मेट्रिक टन डिझेल घेऊन टँकर समुद्रात फिरतोय...
मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच ऊर्जा पुरवठा विस्कळीत झालेला असताना, आता भूमध्य समुद्रात एक भीषण संकट उभे राहिले आहे. 'आर्क्टिक मेटागाझ' नावाचे रशियाचा एक महाकाय गॅस टँकर गेल्या काही दिवसांपासून चालक दलाशिवाय समुद्रात भरकटत आहे. या जहाजात ६०,००० मेट्रिक टन एलएनजी आणि ९०० मेट्रिक टन डिझेल इंधन असून, तांत्रिक बिघाडामुळे ते कोणत्याही क्षणी फुटू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रशियाच्या मुरमान्स्क बंदरातून इजिप्तकडे जात असताना ३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. हल्ल्यामुळे लागलेली आग आणि झालेले नुकसान पाहून जहाजावरील सुमारे ३० क्रू मेंबर्सनी लाईफबोटद्वारे पळ काढला. लिबियाच्या तटरक्षक दलाने या सर्व खलाशांना वाचवून बेंगाजी बंदरात पोहोचवले आहे. सध्या हे जहाज इटली आणि माल्टाच्या दरम्यान भरकटत असून ते एका बाजूला झुकलेले आहे आणि त्याला मोठे भगदाड पडले आहे.
'टिकिंग टाइम बॉम्ब' का म्हटले जातेय?
इटलीच्या सागरी अधिकाऱ्यांनी याला "गॅसने भरलेला टिकिंग टाइम बॉम्ब" असे संबोधले आहे. ६०,००० मेट्रिक टन एलएनजी हा अत्यंत संवेदनशील आणि स्फोटक साठा असून थोडीशी ठिणगीही मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. जर यातील इंधन किंवा गॅस समुद्रात मिसळला, तर भूमध्य समुद्रातील दुर्मिळ प्रजाती आणि पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल, असा इशारा 'WWF' या संघटनेने दिला आहे.
आर्थिक फटका
तेल गळती झाल्यास मासेमारी आणि पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रशियाने या हल्ल्यासाठी थेट युक्रेनच्या नौदल ड्रोनला जबाबदार धरले आहे. मात्र, युक्रेनने यावर अद्याप कोणतीही अधिकधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या इटली आणि माल्टाने समुद्रात प्रदूषण नियंत्रण जहाजे आणि टगबोट्स तैनात केली असून परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.