ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:00 IST2025-12-25T11:59:13+5:302025-12-25T12:00:57+5:30
महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झालेले नाही. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव रब्बी कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसच्या पहाटेच पुन्हा एकदा ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. मेलबर्न येथे एका रब्बीच्या कारवर ‘फायर बॉम्बिंग’ करून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हे एक ज्यू-विरोधी (अँटी-सेमिटिझम) कृत्य असल्याचे म्हटले आहे.
अँटी-सेमिटिझम म्हणजे, ज्यूंप्रति द्वेष, पूर्वग्रह भेदभाव, जो ज्यू समाजाला निशाणा बनवतो अथवा त्या सामाजाप्रति हिंसा, बहिष्कार पसरवतो. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या पहाटे एका रब्बीच्या कारवर फायर बॉम्ब फेकला. या घटनेत कारचा दरवाजा जळालेला दिसत आहे. पोलिसांनी या कुटुंबाचे रेस्क्यू केले.
पोलीस सेंट किल्डा ईस्टमध्ये या ज्यू विरोधी हल्ल्याचा तपास करत आहे. गुरुवारच्या पहाटे 2.50 वाजण्याच्या सुमारास, बालाक्लावा रोडवर रब्बीच्या घराजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या सिल्वर सेडानला आग लावण्याचा प्रयत्न करतण्यात आला. या कारवर 'हॅप्पी हनुक्का'चा एक छोटा बोर्डदेखील लावण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झालेले नाही. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव रब्बी कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आले आहे.
या प्रकरणात, मूरॅबिन क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीची ओळख पटवली असून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. ही घटना अशा ठिकाणी घडली आहे जिथे समोरच एक ज्यू शाळाही आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक ज्यू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेसंदर्भात पंतप्रधान अल्बनीज यांनी शोक व्यक्त केला आहे. "ऑस्ट्रेलियात अशा द्वेषयुक्त घटनांना थारा नाही आणि हे थांबायलाच हवे," असे त्यांनी म्हटे आहे. महत्वाचे म्हणजे, अवघ्या ११ दिवसांपूर्वीच बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या धक्क्यातून ज्यू समाज सावरत असतानाच पुन्हा एकदा हा हल्ला झाला आहे.