युद्धासाठी १२ वर्षापुढील मुलांची लष्करात भरती; अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा इराणवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:11 IST2026-04-04T15:11:03+5:302026-04-04T15:11:24+5:30
शहरांतील चौकांमध्ये नोंदणी सुरू; मुलांना गस्ती, अन्न-वस्तू, लॉजिस्टिक साहाय्यसह इतर कामे

युद्धासाठी १२ वर्षापुढील मुलांची लष्करात भरती; अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा इराणवर गंभीर आरोप
वॉशिंग्टन: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध न संपण्याची चिन्हे दिसत असल्याने इराणने त्यांच्या लष्करात १२ वर्षापुढील मुलांची भरती सुरू केल्याचा खळबळजनक आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने एका अहवालात केला आहे. या अहवालात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे उपप्रमुख रहीम नदाली यांनी रिव्होल्यूशनरी गार्डमधील मोहम्मद रसूल अल्लाह कोरमध्ये मुलांची भरती सुरू केल्याचे नमूद केले आहे.
ही मुले बसिज या निमलष्करी दलाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहे. यात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू आहे. शहरांतील प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त नोंदणी बूथ देखील उघडण्यात आली असून मुलांना गस्ती, लॉजिस्टिक सहाय्य, अन्न-वस्तु, वैद्यकीय मदत यासारख्या जबाबदाऱ्या आहेत. अहवालात ११ वर्षीय अलीरेझा जाफरीचा उल्लेख आहे, जो आपल्या वडिलांसोबत गस्तीवर गेला असता मृत्यूमुखी पडला. अनेक साक्षीदारांनी १६ वर्षांखालील मुले युद्धात सामील झाल्याचे पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, १५ वर्षाखालील मुलांना लष्करात सामील करून घेणे हे युद्धगुन्हा आहे.
अमेरिकेचा पायलट इजेक्ट ?
अमेरिकेचा एक फायटर पायलट दक्षिण-पश्चिम इराणमध्ये आपल्या विमानातून बाहेर (इजेक्ट झाला) आल्याचा दावा इराण सरकारशी संलग्न असलेल्या एका चॅनेलने शुक्रवारी केला. मात्र, त्या विमानाचे नेमके काय झाले, ते पाडण्यात आले की इतर काही बिघाड झाला, हे स्पष्ट झालेले नाही. या चॅनेलने "शत्रूचा पायलट पकडून पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आणि तसे करणाऱ्यांना बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.
मृतांची संख्या १९०० : इराणमध्ये १,९०० पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. तर आखाती देशांमध्ये २५ पेक्षा अधिक, १३ अमेरिकी सैनिक आणि १९ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये १,३०० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत.
अबुधाबीत पाच भारतीय जखमी
युक्त अरब अमिरातीच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे रोखण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष अंगावर पडल्यामुळे शुक्रवारी अबुधाबीमध्ये पाच भारतीय नागरिक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत नेपाळचे सहा, भारताचे पाच नागरिक जखमी झाले. संयुक्त अरब अमिरातीवर इराणकडून डागण्यात आलेली विविध प्रकारची २२ क्षेपणास्त्रे, ४७ ड्रोन पाडण्यात आली. या हल्ल्यांमध्ये कर्तव्य बजावत असताना यूएईच्या सशस्त्र दलातील दोन सैनिकांचा मृत्यू झाला. सशस्त्र दलासाठी काम करणाऱ्या मोरोक्को नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.