ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:29 IST2025-10-20T05:29:06+5:302025-10-20T05:29:06+5:30
‘नो किंग्ज’ या बॅनरखाली शनिवारी एकत्र आलेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये मोर्चा काढत ट्रम्प सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कथित हुकूमशाहीचा व धोरणांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. ‘नो किंग्ज’ या बॅनरखाली शनिवारी एकत्र आलेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये मोर्चा काढत ट्रम्प सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
निषेध करणे हेच देशप्रेम, फॅसिझमचा प्रतिकार करा, या आशयाच्या घोषणा लिहिलेले पोस्टर्स व फलक घेऊन हजारे आंदोलन न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये जमले होते. न्यूयॉर्कसोबतच अटलांटा व शिकागोमधील उद्यानात हजारो लोकांनी मोर्चे काढले. वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस मोर्चा काढला. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षांची सरकार असलेल्या राज्यांमध्येदेखील लोक रस्त्यावर उतरले होते. बिलिंग्ज, मोंटाना येथील न्यायालय परिसर तसेच शेकडो सार्वजनिक जागांवर लोकांनी एकत्र येत ट्रम्प सरकारच्या धोरणांचा विरोध केला.
काय आहे ‘नो किंग्ज’ आंदोलन?
अमेरिकेचा कोणी राजा नाही, अशी या आंदोलनाची भूमिका आहे. १७७६ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेतील राजेशाही संपून देशात लोकशाही व्यवस्था सुरू झाली. त्यामुळे या देशात कोणत्याही राजाचा किंवा हुकूमशाहचा आदेश चालणार नाही, असा संदेश देशभर करण्यात येत असलेल्या आंदोलनातून देण्यात येत आहे. ही निदर्शने ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतरचे तिसरे मोठे आंदोलन ठरले.
२,६०० ठिकाणी आंदोलन
ट्रम्प सरकाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये २,६००हून अधिक ठिकाणी निदर्शने झाली. त्यावेळी आंदोलकांच्या हातात अमेरिकेच्या घटनेची प्रस्तावना असलेली फलक होती. काही लोक फुगवता येण्याजोगे पोशाख परिधान करून आंदोलनात सहभागी झाली होती.
मी काही राजा नाही : ट्रम्प
ट्रम्प फ्लोरिडातील त्यांच्या मार-आ-लागो निवासस्थानी होते. “लोक मला राजा म्हणतात, पण मी राजा नाही,” असे त्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्याच दिवशी त्यांच्या प्रचार खात्याने ट्रम्प यांचा मुकुट घातलेला एआय व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला.
नेतृत्व डाव्या संघटनांकडे
ट्रम्प सरकाच्या धोरणाविरोधात 'नो किंग्ज' या बॅनरखाली देशभर सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व २०० पेक्षा अधिक डाव्या संघटना करत आहेत. ट्रम्प सरकारची फॅसिझमच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा आरोप या संघटनांकडून करण्यात येत आहे.
हेट अमेरिका म्हणत आंदोलनाची हेटाळणी : देशातील सत्ताधारी पक्ष रिपब्लिकन पक्षाने ‘हेट अमेरिका’ असा उल्लेख करत देशभर सुरू असलेल्या या आंदोलनाची हेटाळणी केली आहे.