अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:45 IST2025-08-13T16:45:05+5:302025-08-13T16:45:37+5:30
India Vs America Row: दुसऱ्या महायुद्धापूर्वी अद्ययावत शस्त्रे बनविणाऱ्या कंपन्या आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रे निर्मिती करण्य़ाच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत.

अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा किंग असलेला देश आज भारताच्या मदतीला धावून येण्याची चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या लढाऊ विमानांना इंजिने देण्यास अमेरिका टाळाटाळ करत आहे. यामुळे भारत जपानची मदत घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अद्ययावत शस्त्रे बनविणाऱ्या कंपन्या आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रे निर्मिती करण्य़ाच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत.
फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमसह, भारत देखील प्रगत लढाऊ विमानांसाठी इंजिन तयार करण्यासाठी जपानशी संपर्कात असल्याचे वृत्त ब्लुमबर्गने दिले आहे. भारताला पाकिस्तान, तुर्की आणि चीनपासूनच्या संभाव्य धोक्यांसाठी लढाऊ विमाने तयार करायची आहेत. यासाठी इंजिन खूप महत्वाचे आहे. परंतू, अमेरिका तेजस लढाऊ विमानांसाठी बरेच महिने इंजिन देत नव्हती. दोन-तीन वर्षांनी आता कुठे पहिले इंजिन पाठविण्यात आले आहे. यामुळे भारतीय हवाई दलाकडे विमानांची पोकळी निर्माण झाली आहे.
जपानसारखीच ऑफर फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमने देखील दिलेली आहे. डीआरडीओ या तिन्ही देशांच्या ऑफर्सवर अभ्यास करून पुढील निर्णय घेणार असल्याचे बातमीत म्हटले आहे. भारताने GE F414 इंजिनच्या देशांतर्गत उत्पादनासाठी अमेरिकेसोबत करार केला होता, तो २०२३ मध्ये झाला होता. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताचा अमेरिकेवरील विश्वास खूपच कमी झाला आहे. यामुळे भारत आता नवीन मित्र शोधत आहे. जपानच्या संरक्षण कंपन्यांनी नौदल क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे. एरोस्पेसमध्ये आता या कंपन्यांना हात आजमवायचे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर एकाएकी थांबविलेली शस्त्रास्त्र निर्मिती पुन्हा जोमाने सुरु केली जाणार आहे. जपान केवळ आपल्यापुरतीच शस्त्रे बनवत होता. मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने ऑस्ट्रेलियाला युद्धनौका देण्यासाठी ६.५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे आणि भारतासोबत चर्चा सुरु असल्याचे यात म्हटले आहे.
अमेरिका हा भारतासाठी विश्वासघातकीच देश आहे हे गेल्या काळातील अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. पाकिस्तानला अमेरिकेने त्या काळात अब्जावधींची शस्त्रास्त्रे दिली आहेत. भारताविरोधात लढण्यासाठी दहशतवादाचे पांघरून ओढत अमेरिका पाकिस्तानला लढाऊ विमाने देत आहे, ही विमाने पाकिस्तान भारताविरोधात लढण्यासाठी वापरत आहे. चीन आणि तुर्कीकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी अमेरिकाच पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स पुरवत आहे. जागतिक बँकांना कर्ज देण्यास सांगत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान या मदतीनंतर भारताविरोधात युद्धे लढलेला आहे. यामुळे अमेरिका भविष्यात विश्वास ठेवण्या लायक राहणार नाही, असे संकेत भारतीय नेतृत्वाला मिळू लागले आहेत.