डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 23:54 IST2025-07-07T23:34:12+5:302025-07-07T23:54:35+5:30

US Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी वेगवेगळ्या देशांसाठ टॅरिफ पत्र जारी केले आहे.

America will impose 25 percent tariff on Japan and South Korea Donald Trump announces | डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर

डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर

Donald Trump Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात कराबाबत मित्र राष्ट्रांना धक्का देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून जपान आणि दक्षिण कोरियामधून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादला जाणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही देशांमधील कायमचा व्यापार असमतोल दुरुस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सोमवारी भारतासह १२ हून अधिक देशांच्या नेत्यांना कर पत्रे पाठवणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर हा निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांना उद्देशून दोन खुली पत्रे पाठवली, ज्यात त्यांनी स्पष्ट केले की जर या देशांनी प्रत्युत्तरात्मक कर लादले तर अमेरिका आणखी कठोर कर लादेल. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेत उत्पादन करण्यास प्रोत्साहित केले आहे.

"अमेरिकेला गेल्या अनेक वर्षांपासून जपानसोबत असंतुलित व्यापाराचा सामना करावा लागत आहे आणि आता निष्पक्ष व्यापाराकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिका जपानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५ टक्के कर लादेल. जपानच्या कर, नॉन-टॅरिफ धोरणे आणि व्यापार अडथळ्यांना प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जर जपानने त्या बदल्यात आपले कर वाढवले ​​तर अमेरिका त्यावर अधिक कर लादेल. जर तुम्ही कराची टक्केवारी वाढवली तर आम्ही त्याच्यावर २५ टक्क्यापेक्षा जास्त जोडू," असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

भारतालाही असेच एक पत्र मिळू शकते, ज्यामध्ये २६% कर (१६% नवीन आणि १०% विद्यमान) यांचा उल्लेख असू शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी सुरू आहेत. जर ९ जुलैपूर्वी हा करार झाला नाही, तर भारतावर २६ टक्के कर लादला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी ९० दिवसांत ९० व्यापार करार करण्याचे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत अमेरिका फक्त ब्रिटन आणि व्हिएतनामशीच करार करू शकली आहे.

Web Title: America will impose 25 percent tariff on Japan and South Korea Donald Trump announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.