पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:08 IST2025-04-03T15:06:59+5:302025-04-03T15:08:32+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगभरातील 180 देशांवर परस्पर शुल्क लागू केले आहे.

पेंग्विनकडून शुल्क वसूल करणार? जिथे कुणीच राहत नाही, ट्रम्प यांनी तिथेही 10 टक्के शुल्क लावले
America Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफ लागून करुन जगभरातील अनेक देशांना मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचे नामकरण 'लिबरेशन डे' असे केले असून, विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. या दरम्यान, अंटार्क्टिकाजवळील ऑस्ट्रेलियन बेटावरही अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ लागू केले आहे. विशेष म्हणजे, या बेटावर एकही माणूस राहत नाही.
अमेरिकेचे पेंग्विनवर शुल्क?
ऑस्ट्रेलियन सरकारच्या अखत्यारीतील हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड बेट हे पृथ्वीवरील सर्वात निर्जन ठिकाणांपैकी एक मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातून बोटीने दोन आठवड्यांच्या प्रवासानंतर येथे पोहोचता येते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या दशकभरात येथे एकाही मानवाने पाऊल ठेवले नाही. येथे मानव राहत नाही, तर पेंग्विन, सील आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निवासस्थान आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी या दोन बेटांवर शुल्क का लादले? पेंग्विनवर शुल्क लादले का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
ऑस्ट्रेलियाची प्रतक्रिया
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, या पृथ्वीवर कोणीही सुरक्षित नाही. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफमध्ये कोणतेही तर्क नाही. हे मित्र राष्ट्राचे वर्तन असू शकत नाही. यादरम्यान अल्बानीज यांनी असेही सांगितले की, ऑस्ट्रेलिया प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर कोणत्याही प्रकारचे परस्पर शुल्क लादणार नाही. आम्ही अशा आंधळ्या शर्यतीत सहभागी होणार नाही, जिथे किमती गगनाला भिडतील आणि वाढ रसातळाला जाईल.
अमेरिकेने 180 देशांवर शुल्क लादले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये मीडियाला संबोधित करताना जगभरातील 180 देशांवर परस्पर शुल्क लागू केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही अमेरिकेला पुन्हा समृद्ध करू. यादरम्यान ट्रम्प यांनी भारत, चीन, युरोपियन युनियन, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानसह अनेक देशांचे तक्ते दाखवले आणि त्यांच्यावर शुल्क लागू करण्याची घोषणा केली.