भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:30 IST2025-11-24T15:28:13+5:302025-11-24T15:30:50+5:30
भारताच्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला.

भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. भारताच्या या ३७ वर्षीय वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला.
विंग कमांडर स्याल यांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या F-16 डेमॉन्स्ट्रेशन टीमने २१ नोव्हेंबरचा त्यांचा अखेरचा हवाई कसरतीचा शो रद्द केला. टीम कमांडर मेजर टेलर फेमा हीस्टर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करून, अपघातानंतरही एअर शोचे उड्डाण कार्यक्रम सुरू ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम
दुबई एअर शोच्या शेवटच्या दिवशी विंग कमांडर नमांश स्याल 'तेजस' या स्वदेशी लढाऊ विमानातून कमी उंचीवरून एरोबॅटिक कसरती करत असताना त्यांचे विमान अचानक कोसळले. या दुर्घटनेत नमांश स्याल यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी विंग कमांडर अफांशा अख्तर, ६ वर्षांची मुलगी आणि आई-वडील आहेत.
या दुःखद घटनेनंतर, अमेरिकेच्या F-16 'व्हायपर' डेमॉन्स्ट्रेशन टीमचे कमांडर मेजर टेलर फेमा हीस्टर यांनी तातडीने आपला शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'अपघातानंतरही एअर शोच्या आयोजकांनी उड्डाण कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले.'
'रॉक म्युझिक सुरू होतं, लोक व्हिडीओ काढत होते...'
मेजर हीस्टर यांनी एअर शोच्या परिसरातील हृदयद्रावक चित्र आपल्या पोस्टमध्ये मांडले. ते म्हणाले, "तेजस विमान कोसळल्यानंतरही दुबई वर्ल्ड सेंट्रलमध्ये सगळं काही सामान्यपणे सुरू होतं. स्पीकर्सवर मोठ्या आवाजात रॉक अँड रोल म्युझिक वाजत होते. गर्दी पुढच्या परफॉर्मन्सचे मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करत होती. सगळं काही नॉर्मल सुरू होतं."
दुर्घटनेनंतरचा क्षण सांगताना ते म्हणतात की, "आम्ही सगळ्यांनी दूरून शांतपणे अपघातानंतरचं दृश्य पाहिलं. भारतीय मेंटेनन्स क्रू रिकाम्या पार्किंगजवळ उभे होते. जमिनीवर विमानाची शिडी आणि वैमानिकाच्या वस्तू पडल्या होत्या, ज्या अजूनही त्यांच्या कारमध्ये होत्या. आग विझल्यानंतर आयोजकांनी फ्लाइंग डिस्प्ले सुरू राहील असे कळवताच, मी आमचा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला."
शो सुरू ठेवण्यावर मेजर हीस्टर यांचा सवाल
एअर शो सुरूच राहिल्याबद्दल मेजर हीस्टर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "मी अपघातानंतर एक-दोन तासांनी शोच्या ठिकाणी पोहोचलो, मला वाटलं होतं की परिसर शांत असेल किंवा कार्यक्रम थांबवला असेल. पण तसं नव्हतं. उद्घोषक त्याच उत्साहाने बोलत होते, गर्दी आनंदात होती आणि शेवटी 'आमच्या सर्व परफॉर्मर्सचं अभिनंदन आणि २०२७ मध्ये भेटूया' अशी घोषणा झाली."
त्यांनी पुढे म्हटले की, "माझ्यासाठी हे खूप अस्वस्थ करणारे होते. लोक नेहमी म्हणतात की, शो मस्ट गो ऑन. हे खरं आहे. पण, तुम्ही या जगात नसताना तुमच्याबद्दलही कुणीतरी हेच म्हणेल, याची जाणीव ठेवा."