टार्गेट सेट... इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार! ट्रम्प यांचे सूचक विधान; लष्करी कारवाईला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:56 IST2026-03-30T08:53:34+5:302026-03-30T08:56:03+5:30
Donald Trump: २० भलीमोठी जहाजे अमेरिकेकडे येत आहेत. इराणसोबतच्या कराराबाबत आशावादी असून, अतिशय चांगल्या पद्धतीने वाटाघाटी सुरू आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टार्गेट सेट... इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार! ट्रम्प यांचे सूचक विधान; लष्करी कारवाईला वेग
Donald Trump: मला अचूक आणि नेमके सांगता येणार नाही. परंतु, इराणकडून भली मोठी तेलाने भरलेली २० जहाजे अमेरिकेकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, पुढील काही दिवसांत पूर्ण होईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणमध्ये आधीच सत्तांतर झाले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणसोबतच्या कराराबाबत आशावादी असून, अतिशय चांगल्या पद्धतीने वाटाघाटी सुरू आहेत. हो, मला इराणमध्ये एखादा करार होताना दिसत आहे. तो लवकरच होऊ शकतो. या गोष्टी खूप आधी व्हायला हव्या होत्या. याचे अंतिम परिणाम कसे लागतात हे पाहूच, परंतु सध्या तरी परिस्थिती खूपच चांगली आहे. प्रक्रिया सुरळीतपणे होत आहे. त्यांचे नौदल आता उरलेले नाही, हवाई दलही संपुष्टात आले आहे. ही बाब सर्वांनाच माहिती आहे. आम्ही अनेक, अनेक लक्ष्ये नष्ट केली आहेत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष अशा दोन्ही मार्गांनी चर्चा करत आहोत, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
आमच्या ग्रेट लष्कराने अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली
एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणमध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. दीर्घकाळापासून ज्यांचा शोध घेतला जात होता, अशी अनेक लक्ष्ये आपल्या 'महान लष्कराने', जे जगातील सर्वात उत्कृष्ट आणि अत्यंत संहारक लष्कर आहे, त्यांनी नष्ट केली आहेत. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो! राष्ट्राध्यक्ष DJT, असे ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध व इराणशी सुरू असलेल्या युद्धाच्या विरोधात संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये 'नो किंग्स' रॅलींच्या माध्यमातून जनक्षोभ उसळला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिससह अमेरिकेतील लहान-मोठ्या शहरांमध्ये लाखो आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध केला. "आम्हाला राजा किंवा हुकूमशहा नको, तर लोकशाही हवी आहे," अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी रस्ते व्यापून टाकले होते. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्येही १ लाखांहून अधिक लोक जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हे आंदोलन केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता जगातील १२ पेक्षा जास्त देशांत पसरले. अमेरिका-युरोपमध्ये ३,३०० ठिकाणी भव्य निदर्शने, लोकशाहीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. ट्रम्प यांचा निषेध करण्यासाठी सुमारे ८० लाख नागरिक रस्त्यावर उतरल्याचे म्हटले जात आहे.
US President Donald Trump (@POTUS) posts on Truth Social, "Big day in Iran. Many long sought after targets have been taken out and destroyed by our GREAT MILITARY, the finest and most lethal in the World. God bless you all! President DJT" pic.twitter.com/w4we7rUc72
— Press Trust of India (@PTI_News) March 30, 2026