'इराणनेच त्यांच्या शाळेवर हल्ला केला...' डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:01 IST2026-03-08T16:00:47+5:302026-03-08T16:01:57+5:30
America-Israel-Iran : इराणमध्ये मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात 150 हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे.

'इराणनेच त्यांच्या शाळेवर हल्ला केला...' डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप
America-Israel-Iran : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावादरम्यान, इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरात मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला असून, मृतांमध्ये बहुसंख्य लहान मुलींचा समावेश आहे. या घटनेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ट्रम्प यांनी इराणला ठरवले जबाबदार
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, आम्हाला वाटते हा हल्ला इराणकडून झाला आहे. त्यांच्या शस्त्रांची अचूकता कमी असल्यामुळे चुकीच्या ठिकाणी बॉम्ब पडला. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्याप ना अमेरिकेने स्वीकारली आहे ना इस्रायलने.
इराणचा अमेरिकेवर थेट आरोप
दुसरीकडे इराणने या हल्ल्यासाठी थेट अमेरिकेलाच जबाबदार धरले आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या शनिवारी एका मिसाइल किंवा हवाई हल्ल्यात मुलींच्या शाळेला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि इतर नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. ‘एएफपी’ वृत्तसंस्थेने सांगितले की त्यांना घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची खात्री करता आलेली नाही आणि मृतांचा आकडाही स्वतंत्रपणे पडताळता आलेला नाही.
अमेरिकन तळावर इराणचा प्रतिहल्ल्याचा दावा
दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला की, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकेच्या अल-धाफरा एअरबेसवर ड्रोन आणि अचूक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला केला. IRGC च्या म्हणण्यानुसार, याच तळावरून शाळेवर झालेल्या हल्ल्याची कारवाई करण्यात आली होती. पेंटागॉनने मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले की, अमेरिका जाणीवपूर्वक कोणत्याही शाळेला लक्ष्य करणार नाही.
मिनाब परिसरात लष्करी तळ
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका अहवालानुसार, अमेरिकन सैन्याने होर्मुज सामुद्रधुनीजवळील नौदल तळांवर कारवाई केल्याचा उल्लेख केला आहे. या परिसरात इराणच्या रिवोल्युशनरी गार्ड्सचा नौदल तळही असल्याने ही कारवाई त्याच लष्करी कारवाईदरम्यान घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रॉयटर्सचा वेगळा दावा
दरम्यान, ‘रॉयटर्स’च्या एका विशेष अहवालात लष्करी तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यासाठी अमेरिकन सैन्य जबाबदार असण्याची शक्यता आहे. मात्र तपास अद्याप पूर्ण झालेला नसून अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. या घटनेमुळे मध्यपूर्वेत आधीच वाढलेल्या तणावात आणखी भर पडली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.