अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:37 IST2026-04-03T13:36:36+5:302026-04-03T13:37:49+5:30
America-Iran-Israel: 'जिनिव्हा कन्व्हेन्शन म्हणजे काय? आता का होतेय चर्चा? जाणून घ्या...

अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
America-Iran-Israel: इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. अमेरिका आणि इस्रायलने आता इराणच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले वाढवल्याचे वृत्त आहे. पूल, स्टील प्लांट, वैद्यकीय सुविधा केंद्रे यांसारख्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होत आहे का? यावर चर्चा सुरू झाली असून जिनिव्हा कन्व्हेन्शन पुन्हा चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत जिनिव्हा कन्व्हेन्शन काय आहे आणि युद्धामध्ये कोणते नियम पाळावे लागतात? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
जिनिव्हा कन्व्हेन्शन काय आहे?
जिनिव्हा कन्व्हेन्शनची सुरुवात 1859 मध्ये इटलीतील बॅटल ऑफ सोलफेरिनो युद्धानंतर झाली. या युद्धात हजारो सैनिक जखमी अवस्थेत रणांगणावर तडफडत पडले होते. त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नव्हती. त्या वेळी स्वित्झर्लंडचे व्यापारी हेन्री ड्युनाँ यांनी हे दृश्य पाहिले आणि ते हादरले. त्यांनी जखमी सैनिकांच्या उपचारासाठी मदत केली आणि नंतर “A Memory of Solferino” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून त्यांनी जगातील देशांना आवाहन केले की, युद्धात जखमी सैनिक आणि पीडितांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय नियम बनवावेत.
1864 ते 1949; जिनिव्हा करारांचा विस्तार
1864 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात 12 देशांनी एकत्र येऊन पहिला आंतरराष्ट्रीय करार केला. यालाच जिनिव्हा कन्व्हेन्शन म्हणतात. या करारानुसार युद्धात जखमी सैनिकांना कोणताही भेदभाव न करता वैद्यकीय मदत देणे बंधनकारक करण्यात आले. नंतर 1949 मध्ये या कराराचा विस्तार करण्यात आला आणि चार प्रमुख करार तयार करण्यात आले. यात खालील गोष्टींचा समावेश करण्यात आला:
1- रणांगणावरील जखमी सैनिकांचे संरक्षण
2- समुद्रातील जखमी किंवा अडकलेल्या सैनिकांचे संरक्षण
3- युद्धकैद्यांचे हक्क
4- सामान्य नागरिकांचे संरक्षण
यानंतर वेळोवेळी यात आणखी 3 प्रोटोकॉल जोडण्यात आले. आज जिनिव्हा कन्व्हेन्शन हे आधुनिक आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचा आधार मानले जाते.
युद्धामध्ये काय करू नये?
जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार युद्धामध्ये काही गोष्टी पूर्णपणे बंदी आहेत.
1- जखमी सैनिकांवर हल्ला करू नये
2- जखमी शत्रू सैनिकांनाही वैद्यकीय मदत द्यावी
3- युद्धकैद्यांवर अत्याचार करू नये
4- महिलांवर, मुलांवर आणि वृद्धांवर हल्ला करू नये
5- शाळा, रुग्णालये, घरे यांना लक्ष्य बनवू नये
6- शारीरिक किंवा मानसिक छळ करू नये
7- नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक
म्हणजेच, युद्ध सुरू असले तरी मानवता आणि मानवी हक्कांचे काही मूलभूत नियम पाळणे सर्व देशांसाठी बंधनकारक आहे.
जिनिव्हा कन्व्हेन्शनची चर्चा का?
इराणमधील पायाभूत सुविधा, पूल, औद्योगिक प्रकल्प आणि वैद्यकीय केंद्रांवर हल्ले झाल्याच्या बातम्यांनंतर या हल्ल्यांमुळे जिनिव्हा कन्व्हेन्शनचे उल्लंघन होत आहे का, यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. कारण जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार नागरिक आणि वैद्यकीय सुविधांवर हल्ला करणे युद्ध गुन्हा मानला जाऊ शकतो.