"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:48 IST2026-04-08T11:48:20+5:302026-04-08T11:48:38+5:30
इराणने युद्धाच्या सुरुवातीपासूनच होर्मुझची नाकेबंदी केली होती. हा मार्ग त्यांनी सुरुवातीपासूनच शत्रू देशांसाठी बंद केला होता. जो आता सर्वांसाठी खुला होईल...

"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
अमेरिका आणि इराणयुद्धात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली. या युद्धविरामातील महत्वाची अट म्हणजे, 'होर्मुझच्या समुद्रधुनी'ची नाकेबंदी हटवणे आणि जहाजांना सुरक्षित मार्ग करून देणे, ही आहे. महत्वाचे म्हणजे, या घोषणेनंतर, ट्रम्प यांनी इराणला एक नवीन संदेशही दिला आहे.
ट्रम्प म्हणाले, "होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी अमेरिका इराणला मदत करेल." तत्पूर्वी, इराणने युद्धाच्या सुरुवातीपासूनच होर्मुझची नाकेबंदी केली होती. हा मार्ग त्यांनी सुरुवातीपासूनच शत्रू देशांसाठी बंद केला होता. जो आता सर्वांसाठी खुला होईल.
इराणला मोठी सवलत -
महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांनी इराणला मोठा दिलासा देताना युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांचे पुनर्निमाण करण्यास परवानगी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमध्ये तेहरान, कौम यांसारख्या मोठ्या शहरांचे प्रचंड नुकसान जाले. याशिवाय, अमेरिकेने इराणचा सर्वात मोठा पूलही उडवून दिला. याशिवाय, अमेरिका आणि इस्रायलने इराणची विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले चढवले होते.
विशेष म्हणजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून आणि तेलवाहू जहाजांकडून टोल घेतला जाईल, ज्याचा उपयोग पुनर्बांधणीच्या कामांसाठी केला जाईल, असी एक अट इराणने युद्धविरामाच्या कलमांमध्ये केली आहे. तत्पूर्व, अमेरिका आणि इस्रायलने आपल्याल नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही इराणने केली होती.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर काय म्हणाले ट्रम्प?
इराणसोबतच्या युद्धविरामासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, आपण दोन आठवडे इराणवरील हल्ले थांबवण्यास तयार आहोत. इराण देखील होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली करण्यास सहमत आहे. मला इराणकडून १०-कलमी प्रस्ताव मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे.