प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:34 IST2026-01-09T16:33:45+5:302026-01-09T16:34:35+5:30
ग्रीनलँडसाठी ट्रम्प यांचा मोठा डाव, नागरिकांना थेट पैशांचे आमिष!

प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
America-Greenland: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अनेक वर्षांपासून जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या 'ग्रीनलँड'वर डोळा आहे. त्यांनी अनेकदा जाहीररित्या ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे वक्तव्य केले आहे. यासाठी ते साम, दाम, दंड...अशा मार्गांचा अवलंब करण्यासही तयार आहेत. दरम्यान, आता त्यांनी ग्रीनलँड मिळवण्यासाठी नवीन युक्ती लढवली आहे. ट्रम्प प्रशासनाने थेट तेथील नागरिकांना आर्थिक आमिष देण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे.
ग्रीनलँडच्या नागरिकांना आमिष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रीनलँडमधील नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ट्रम्प सरकार प्रत्येक नागरिकाला 10,000 ते 1,00,000 डॉलर्स (सुमारे 9 लाख ते 90 लाख रुपये) एकरकमी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. ग्रीनलँडची लोकसंख्या सुमारे 57 हजार असून, ही योजना प्रत्यक्षात आली, तर अमेरिकेला जवळपास 5.7 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागू शकतात.
वॉशिंग्टनमध्ये चर्चा सुरू
सूत्रांच्या माहितीनुसार, वॉशिंग्टनमध्ये या मुद्द्यावर उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार ग्रीनलँडला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी विविध राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक पर्यायांचा विचार करत आहेत. या प्रस्तावामुळे डेन्मार्क, युरोप आणि NATO देशांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ग्रीनलँड अमेरिकेसाठी का महत्त्वाचे?
लोकसंख्या कमी असली तरी ग्रीनलँडचे रणनीतिक आणि लष्करी महत्त्व अत्यंत मोठे मानले जाते. आर्क्टिक क्षेत्रातील स्थान, नैसर्गिक संसाधने आणि लष्करी दृष्टिकोनातून हा प्रदेश अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही स्पष्टपणे सांगितले होते की, ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवणे हे अमेरिकेच्या जागतिक ताकदीसाठी केवळ भौगोलिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.
लष्करी पर्यायाच्या उल्लेखाने तणाव वाढला
अलीकडेच ट्रम्प यांनी गरज पडल्यास लष्करी कारवाईचाही विचार केला जाऊ शकतो, असे विधान केल्यामुळे परिस्थिती अधिकच तापली आहे. या वक्तव्याकडे नाटो देशांकडून थेट इशारा म्हणून पाहिले जात आहे. डेन्मार्क आणि ग्रीनलँड प्रशासनाने आधीच स्पष्ट भूमिका घेतली असून, ग्रीनलँड विक्रीसाठी नाही, असे ठामपणे सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाटोच्या एकतेस धोका ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, तरीही ट्रम्प सातत्याने ग्रीनलँड मिळवण्याबाबत वक्तव्ये करत आहेत.
ग्रीनलँडमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
ग्रीनलँडमधील नागरिकांमध्ये या घडामोडींमुळे भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांना ट्रम्प यांच्या लष्करी धमक्यांमुळे चिंता वाटत आहे. दरम्यान, ग्रीनलँडमधील मुख्य विरोधी पक्ष नालेराक यांनी या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिले आहे. अमेरिकेच्या वाढत्या रसामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते, असे पक्षाचे मत आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की ग्रीनलँडवासी ना अमेरिकन बनू इच्छितात, ना डॅनिश, त्यांना फक्त ग्रीनलँडर म्हणून आपली स्वतंत्र ओळख जपायची आहे.