“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 23:03 IST2025-06-23T23:01:12+5:302025-06-23T23:03:25+5:30
America Entry in Israel Iran War: अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, कतार येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली असल्याचे वृत्त आहे.

“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
America Entry in Israel Iran War:इस्रायल-इराण यांच्यात पेटलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. या हल्ल्यांमुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून जगभर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉडों आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. सुमारे १३ हजार ६०० किलो वजनाचा एक बॉम्ब असे १४ बॉम्ब टाकून हे केंद्र नष्ट केले. यासोबत अमेरिकेच्या पाणबुड्यांनीही ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे इराणच्या नतांझ आणि इस्फहान आण्विक केंद्राच्या दिशेने डागली. नतांझवर एक बस्टर्ड बॉम्बही टाकण्यात आला. यानंतर आता इराणने कतार येथील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. एका इस्रायली अधिकाऱ्याचा हवाला देण्यात आला आहे. एका रिपोर्टमध्ये सदर दावा करण्यात आला आहे. या हल्ल्याकडे इराणने अमेरिकेविरुद्ध घेतलेला प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. इराणच्या अणुतळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव सतत वाढत आहे.
स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार
रशियाचे उप परराष्ट्र मंत्री रियाबकोव्ह यांनी सांगितले की, इराणला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. मॉस्को आणि तेहरानमधील धोरणात्मक भागीदारी अतूट असल्याचे म्हटले आहे. इराणने रशियाकडून लष्करी मदत मागितली आहे का, असे विचारले असता, रियाबकोव्ह यांनी इंटरफॅक्सला सांगितले की दोन्ही देश अनेक क्षेत्रात सहकार्य करत आहेत, अधिक तपशील देणे बेजबाबदारपणाचे ठरेल. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्री अब्बास अराघची यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पत्र देत पुतिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इराणने या प्रदेशातील अमेरिकन लष्करी दलांवर संभाव्य हल्ल्याच्या तयारीसाठी क्षेपणास्त्र लाँचर्स तैनात केल्याचे वृत्त आहे. इराणच्या या प्रतिहल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. कतार येथील अमेरिकेचा तळ मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी कारवायांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून काम करतो, अशी माहिती देण्यात आली आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल डागलेल्या क्षेपणास्त्रांचे आवाज कतारची राजधानी दोहा येथे ऐकू आले, असे प्रत्यक्षदर्शींनी रॉयटर्सला सांगितले. तसेच या भागातील परिस्थिती अजूनही स्थिर आहे. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा निरीक्षक इराणच्या लष्करी भूमिकेवर आणि आखातातील अमेरिकेच्या मालमत्तेवर होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे.