अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:01 IST2025-06-22T16:00:30+5:302025-06-22T16:01:01+5:30
America Attack on Iran : अणुबॉम्ब हा केवळ इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने केलेला बहाणा आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
इस्राइल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, आज अमेरिकेने अमेरिकेने पहाटेच्या सुमारास इराणमधील तीन अणुकेंद्रांना लक्ष्य करून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या अणुकेंद्रांचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असल्याचा दावा करत आधी इस्राइल आणि आता अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केले आहे. मात्र अणुबॉम्ब हा केवळ इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने केलेला बहाणा आहे. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. दरम्यान, हा असा भाग आहे जिथून जगाच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नापैकी २६ टक्के खनिज तेल मिळतं. सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती यां जगातील आघाडीच्या १० खनिज तेल उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. मात्र इस्राइल आणि इराणमधील संघर्षामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचं कारण दिलं असलं तरी इराणमध्ये मुबलक प्रमाणात असलेले खनिज तेलाचे साठे हेही या हल्ल्यामागचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे.
मध्य पूर्वेतील इतर आखाती देशांप्रमाणेच इराणमध्येही खनिज तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. इराणमधून दररोज ३.३ दशलक्ष बॅरल एवढं खनिज तेल उत्पादित केलं जातं. इराण दररोज २ दशलक्ष बॅरल खनिज तेल आणि शुद्धिकरण केलेल्या तेलाची निर्यात करतो. तसेच त्यामधून इराणची अर्थव्यवस्था चालते. दरम्यान, इराणवर अणुबॉम्बच्या संशयावरून हल्ला करणाऱ्या डोनाल्ड ट्र्म्प यांची नजर या खनिज तेलाच्या साठ्यांवर असण्याची शक्यता आहे. इराणमध्ये आपल्याला हवं तसं सत्तांतर घडवून तिथल्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा हेतू असू शकतो.
आखाती देशांमधील बहुतांश भाग हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे आपलं तिथलं वर्चस्व भक्कम करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. एवढंच नाही तर इराणमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून चीन आणि रशियाला कमकुवत करण्यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे.