सिएटल : एका प्रवाशाने विमानातील सर्वांना ठार मारण्याची धमकी देऊन गोंधळ घातल्यामुळे अलास्का एअरलाइन्सच्या एका विमानाला येथील विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अलास्का एअरलाईन्सचे ४२२ हे विमान सकाळी ११.१0 वा. सी-टॅक विमानतळावरून उडाले. ते शिकागोला चालले होते. उड्डाणानंतर सुमारे २0 मिनिटांनी विमान पुन्हा सिएटलला परतले. पोर्ट आॅफ सिएटलच्या पोलिसांनी विमानाचा ताबा घेऊन एका व्यक्तीला अटक केली. त्याला तातडीने किंग कंट्री तुरुंगात डांबण्यात आले. त्याच्या विरुद्ध प्रवाशांच्या छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.अलास्का एअरलाइन्सने म्हटले की, विमान उड्डाण करीत असताना एक प्रवासी अचानक अत्यंत अस्वस्थ झाला, तसेच तो शारीरिकदृष्ट्याही अत्यंत आक्रमक झाला. विमानातील सर्व प्रवाशांना ठार मारण्याची धमकी तो देत होता. आरडा-ओरडा करीत होता. तथापि, चालक दलाचे सदस्य आणि दोन सबल प्रवाशांनी त्याच्यावर ताबा मिळविला. एक कायदापालन संस्थेचा अधिकारी सुदैवाने विमानात होता. आक्रमक प्रवाशाला काबूत आणण्यात या अधिकाºयाची विशेष मदत झाली. गोंधळकर्त्या प्रवाशास ताबडतोब ताब्यात घेण्यात आले आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.या घटनेचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून, एक व्यक्ती जोरजोरात आरडाओरडा करताना दिसत आहे. ‘मी विमानातील सर्व प्रवाशांना ठार मारीन. ख्रिस्ताच्या नावाने मरा’, असे तो ओरडून ओरडून सांगताना दिसत आहे. त्याचवेळी दोन प्रवासी त्याला खाली पाडताना दिसतात. सर्व काही ठीक होईल, असे ते इतर प्रवाशांना सांगताना दिसून येतात.- माथेफिरू प्रवाशावर नियंत्रण मिळविल्यानंतर एका फ्लाईट अटेंडंटने ‘विमान जवळच्या विमानतळावर उतरविण्यात येणार असल्या’ची घोषणा लाऊडस्पीकरवरून केली.- सर्व काही नियंत्रणात आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही विमानातील प्रवाशांना करण्यात आले. नंतर अलास्का एअरलाइन्सने सांगितले की, हे विमान रद्द करण्यात आले असून, शिकागोला जाण्यासाठी प्रवाशांची सोय दुसºया विमानाद्वारे करण्यात आली आहे.
अलास्का एअरलाइन्सचे विमान धमकीनंतर आपत्स्थितीत उतरविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 05:15 IST