पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:43 IST2025-11-16T08:38:46+5:302025-11-16T08:43:03+5:30
Pakistan Politics: तब्बल २० वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आले या देशाचे प्रमुख

पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
Pakistan Jordan Relationship: पाकिस्तानने अलीकडेच सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे. सौदी अरेबियानंतर आता पाकिस्तान दुसऱ्या एका मुस्लिम देशासोबत आपले संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलताना दिसत आहे. तो देश आहे जॉर्डन. जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय शनिवारी दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आले. २० वर्षांत हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नूर खान हवाई तळावर राजा अब्दुल्ला द्वितीय यांचे स्वागत केले.
पाकचे बडे नेते स्वागताला हजर
अब्दुल्लाह द्वितीय यांच्या स्वागतासाठी मंत्री मुसादिक मलिक आणि वजिहा कमर हे देखील उपस्थित होते, तसेच पहिल्या महिला बीबी आसिफा भुट्टो झरदारी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी देखील उपस्थित होते. रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शरीफ यांच्या निमंत्रणावरून राजा अब्दुल्ला द्वितीय हे या भेटीवर आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची ही नवी खेळी असू शकते, अशी चर्चा आहे.
Delighted to host and meet my brother, His Majesty King Abdullah II ibn Al Hussein this evening. It was an honour to receive him in Islamabad earlier today.
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) November 15, 2025
During our warm and cordial meeting, we explored ways to further deepen our historic brotherly ties through enhanced… pic.twitter.com/GuY7QT6s4N
शाही विमानाला हवाई एस्कॉर्ट
इस्लामाबादबाहेरील नूर खान एअरबेसवर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. तिथे पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी राष्ट्रीय हवाई क्षेत्रात प्रवेश करताना शाही विमानाला एस्कॉर्ट केले.
दौऱ्याचा हेतू काय?
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जॉर्डनच्या राजाने २० वर्षांहून अधिक काळानंतर ही पहिलीच भेट दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जॉर्डनशी असलेले संबंध दीर्घकालीन आणि बंधुत्वावर आधारित असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की ही नवीन बैठक राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सुरक्षा बाबींचा समावेश करून अधिक महत्त्वाकांक्षी मार्ग निश्चित करण्याच्या उद्देशाने आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राजा अब्दुल्ला द्वितीय हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत स्वतंत्रपणे भेटी घेतील आणि त्यानंतर दोन्ही सरकारांमध्ये विस्तृत चर्चा होईल. राष्ट्रपती राजवाड्यात एक समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे. तिथे राजाला पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला जाईल.