ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:14 IST2025-06-23T13:11:50+5:302025-06-23T13:14:47+5:30
पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
इस्लामाबाद - पाकचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकने अमेरिकेला गोंजारण्याचे काम केले. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना २०२६ चा शांततेसाठी मिळणारा नोबेल पुरस्कार मिळावा अशी शिफारस पाकिस्तानने केली. मात्र इराणवरील हल्ल्यानंतर पाकची पुन्हा फजिती झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव नोबेलसाठी पाठवण्याबाबत पुनर्विचार करावा अशी पाकमधल्या नेत्यांनी मागणी केली आहे. २० जूनला पाकिस्तानी सरकारने भारत-पाकिस्तान यांच्यात शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारासाठी केली होती.
पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र नॉर्वेत नोबेल शांतता पुरस्कार समितीला पाठवले होते. मात्र अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, इस्फहान आणि नतांज इथल्या अणु केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारची चांगलीच गोची झाली. पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. जमियत उलेमा ए इस्लामचे प्रमुख नेते मौलाना फजलुर रहमान यांनी सरकारकडे निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत ते म्हणाले की, राष्ट्रपती ट्रम्प यांचा शांततेचा दावा खोटा निघाला. नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव परत मागे घ्यायला हवे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच पाकिस्तानी सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी एकत्रित लंच केले. अमेरिकेच्या या पाहुणचारामुळे पाकिस्तानी नेतेही आणि सरकार फारच खुश झाले. त्यांना इतका आनंद झाला की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठीच त्यांनी शिफारस पत्र पाठवले. परंतु ट्रम्प यांनी पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनान आणि इराणवरील इस्त्रायली हल्ल्याचे समर्थन केले. मग ते शांततेचे पुरस्कर्ते कसे होऊ शकतात असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तर डोनाल्ड ट्रम्प शांतता दूत राहिले नाहीत तर असे नेते आहेत ज्यांनी जाणुनबुजून बेकायदेशीर युद्ध लादले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा या निर्णयाचा फेरविचार करावा. हा निर्णय रद्द केला पाहिजे अशी मागणी माजी सिनेटर मुशाहिद हुसैन यांनी केली आहे. ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्त्रायलला युद्धाच्या जाळ्यात अडकवले ही त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळातील सर्वात मोठी चूक आहे अशा शब्दात हुसैन यांनी ट्रम्प भूमिकेवर टीकास्त्र सोडले.