अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:50 IST2025-10-12T13:48:49+5:302025-10-12T13:50:54+5:30
Afghanistan vs Pakistan : 11 ऑक्टोबरच्या रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सात ठिकाणांवर जोरदार हल्ल्यामुळे दोन्ही देश आमने-सामने आले आहेत.

अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
Afghanistan vs Pakistan : 11 ऑक्टोबरच्या रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सात ठिकाणांवर जोरदार हल्ला केला. अफगाणिस्तानच्या दाव्यानुसार, या कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, 7 जणांना बंदी बनवण्यात आले आहे. अफगाण सैनिकांनी काही पाकिस्तानी शस्त्रेही जप्त केली आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही जोरदार गोळीबार केला, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चकमक सुरू राहिली.
या घटनांनंतर एक मोठा प्रश्न निर्माण होतो की, तालीबानकडे नक्की कोणती लष्करी ताकद आहे आणि ते पाकिस्तानच्या सेनेसमोर किती काळ तग धरू शकतात?
दोन्ही देश गरीब, अस्थिर आणि संघर्षग्रस्त
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश अनेक दशकांपासून गरीबी, राजकीय अस्थिरता आणि दहशतवादाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. दोन्हींच्या सीमांवर सतत तणाव असतो, त्यामुळे बाह्य शक्तींनी या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान 1947 पासून अस्थिर आहे. तर, अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने 2021 माघार घेतल्यानंतर तालीबानने पुन्हा सत्ता हस्तगत केली.
अफगाणिस्तानची ताकद आणि मर्यादा
तालीबान सध्या सुमारे २ लाख सैनिकांच्या सैन्याचे नेतृत्व करतो. हे लढवय्ये विशेषतः डोंगराळ आणि कठीण प्रदेशांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित आहेत. त्यांची ताकद पारंपरिक युद्धात नसून, गोरिल्ला शैलीतील(अचानक हल्ले, वेगवान हालचाली आणि शत्रूला थकविण्याची रणनीती) लढाईत आहे.
तालीबानकडे असलेली शस्त्रे
अफगाणिस्तानकडे स्वतःचे आधुनिक शस्त्रनिर्मिती तंत्रज्ञान नाही. तर, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे प्रामुख्याने अमेरिकेने मागे सोडलेली शस्त्रे आहेत. रिपोर्टनुसार, अफगाण सैन्याकडे शेकडो टँक, काही बख्तरबंद वाहने आणि अमेरिकन रायफल्स व रॉकेट लॉन्चर्स आहेत. पण ही साधने बहुतांश जुनी किंवा मर्यादित आहेत.
हवाई शक्ती
अफगाणिस्तानकडे सध्या सक्रिय लढाऊ विमाने नाहीत. 2016–2018 दरम्यान अमेरिकेने दिलेली A-29 Super Tucano हलकी अटॅक विमाने (सुमारे 26) अजून काही प्रमाणात कार्यरत आहेत. काही हेलिकॉप्टर आणि ड्रोन उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा वापर मर्यादित आहे. हवाई लढाईत अफगाणिस्तान पाकिस्तानच्या तुलनेत अत्यंत कमजोर आहे.
मिसाइल आणि एअर डिफेन्स
मिसाइल शक्तीच्या बाबतीतही अफगाणिस्तान मागे आहे. काही सोव्हिएत काळातील जुनी बॅलिस्टिक मिसाइल्स आहेत, ज्यांची कार्यक्षमता आता कमी आहे. काही अहवालांनुसार तालीबानने अलीकडे नवीन मिसाइल सिस्टम विकत घेतल्याचे म्हटले जाते, पण त्याचा स्त्रोत स्पष्ट नाही. त्यांच्याकडे आधुनिक एअर डिफेन्स सिस्टम नाही, फक्त शॉर्ट-रेंज अँटी-एअरक्राफ्ट गन आणि रॉकेट लॉन्चर्स आहेत. रशियाच्या मदतीने तालीबान आपली हवाई संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती अजून प्राथमिक स्तरावर आहे.
पाकिस्तानची स्थिती
पाकिस्तानला 75 वर्षांचा इतिहास असूनही, तेथील परिस्थिती फार चांगली नाही. वारंवार सैनिकी बंड, राजकीय अस्थिरता, दहशतवादाचा वाढता प्रभाव आणि IMF कडून आर्थिक मदतीवर अवलंबित्वामुळे पाकिस्तान आज गंभीर आर्थिक संकटात आहे.
कोण वरचढ?
जमिनीवरील युद्धात अफगाणिस्तानचे तालीबानी लढवय्ये गोरिल्ला तंत्रामुळे वरचढ ठरू शकतात. पण हवाई आणि तांत्रिक युद्धात पाकिस्तानकडे आधुनिक फायटर जेट्स, मिसाइल सिस्टम आणि प्रशिक्षण असल्यामुळे तो अधिक सक्षम आहे. दोन्ही देशांकडे दीर्घकालीन युद्धासाठी आर्थिक क्षमता नाही, पण जर हा संघर्ष वाढला, तर तो संपूर्ण दक्षिण आशियासाठी गंभीर धोका बनू शकतो.