Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 07:36 IST2025-09-02T07:33:17+5:302025-09-02T07:36:21+5:30
Afghanistan Earthquake News: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
काबूल: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला तर २,५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ही माहिती तालिबान सरकारने सोमवारी दिली. मृत, जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या देशातील कुनार प्रांतात हा भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनुसार, रविवारी रात्री ११:४७ वाजता आलेल्या भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहराच्या ईशान्येस २७ किलोमीटर दूर, तसेच जमिनीखाली ८ किलोमीटर खोलवर होते. ज्या भूकंपाचे केंद्र कमी खोलीवर असते, ते सहसा मोठे नुकसान करतात. रविवारी या भूकंपानंतरही अनेक वेळा धक्के बसले. या भीषण नैसर्गिक संकटाच्या तडाख्यामुळे कुनार प्रांतातील अनेक गावांतील इमारती कोसळल्या. त्याच्या ढिगाऱ्याखाली लोक गाडले गेले.
The 6.0-magnitude earthquake that struck Afghanistan on August 31 has killed 800 people and injured over 2,500.
— BFM News (@NewsBFM) September 2, 2025
Its shallow depth caused severe damage, especially to low-rise, mud-brick homes where most Afghans live.
🧵1 https://t.co/qR8ox5Vsvmpic.twitter.com/fBgeE1B4Hj
भारताने पाठविले १ हजार तंबू, १५ टन धान्य
भारताने भूकंपग्रस्त अफगाणिस्तानमध्ये तातडीने १ हजार तंबू, १५ टन अन्नधान्य, अन्य अत्य़ावश्यक गोष्टींची मदत पाठविली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. तालिबान शासनाला औपचारिक मान्यता दिली नसतानाही, भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत पाठविली आहे. आणखी मदत पाठविण्याची तयारी दर्शविली.
२०२३च्या भूकंपात ४ हजार जणांचा मृत्यू
७ ऑक्टोबर २०२३ रोजी अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी ४,००० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या १,५०० होती. हा भूकंप गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीतील सर्वात विनाशकारी नैसर्गिक आपत्ती होती.