Afghanistan Crisis: खच्चून भरलेली गर्दी, दाटीवाटीनं प्रवास; अफगाणिस्ताहून निघालेल्या 'त्या' विमानानं रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 14:36 IST2021-08-22T14:34:48+5:302021-08-22T14:36:26+5:30
Afghanistan Crisis: काबुलहून उड्डाण केलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या विमानाचा अनोखा विक्रम

Afghanistan Crisis: खच्चून भरलेली गर्दी, दाटीवाटीनं प्रवास; अफगाणिस्ताहून निघालेल्या 'त्या' विमानानं रचला इतिहास
काबुल: अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केला असून दिवसागणिक देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. लाखो लोक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. काबुल विमानतळावरील परिस्थिती अनेकदा नियंत्रणाबाहेर जात आहे. चेंगराचेंगरी, गोळीबाराच्या घटना घडत आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिकन हवाई दलाचं विमान काबुलच्या विमानतळावर उतरलं. अफगाणिस्तान सोडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या शेकडो लोकांनी या विमानात गर्दी केली. क्षमतेच्या कितीतरी पट अधिक जण विमानात शिरले. त्यानंतर विमानानं उड्डाण केलं. त्या उड्डाणानं नवा विक्रम रचला आहे.
देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेकडो लोकांनी काबुल विमानतळावर गर्दी केली. विमानात जागा मिळेल तिथे अफगाणी नागरिक जाऊन बसले. काहींनी विमानाला लटकून प्रवास केला. विमामानं उड्डाण घेताच काही मिनिटांतच लटकून प्रवास करणारे नागरिक खाली कोसळले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. तालिबानीच्या भीतीनं देश सोडण्यासाठी विमानतळावर जमलेल्या ८२३ अफगाणी नागरिक विमानात शिरले. याआधी अमेरिकेनं हवाई दलाच्या विमानातून कधीही इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी प्रवास केलेला नाही. त्यामुळे नव्या विक्रमाची नोंद झाली.
कतारला जाणाऱ्या हवाई दलाच्या विमानातून ६४९ जणांनी प्रवास केल्याची माहिती याआधी अमेरिकेकडून देण्यात आली होती. मात्र आता या आकडेवारीत हवाई दलाकडून सुधारणा करण्यात आली आहे. तब्बल ८२३ नागरिकांना घेऊन उड्डाण करणाऱ्या अमेरिकन हवाई दलाच्या विमानानं नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे सी-१७ ग्लोबमास्टर विमानाची एकूण क्षमता १३४ प्रवासी इतकीच आहे. मात्र क्षमतेपेक्षा सहापट प्रवाशांसह उड्डाण करून अमेरिकन हवाई दलानं नवा विक्रम रचला आहे.