Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:23 IST2021-09-01T13:18:24+5:302021-09-01T13:23:51+5:30
Afghanistan Crisis: तालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज

Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत
काबूल: अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला अद्याप पंजशीरवर कब्जा करता आलेला नाही. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे दावे करणारा तालिबान पंजशीरवर हल्ले करत आहे. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. पंजशीर प्रांतात घुसखोरीचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत. तालिबाननं काल रात्रीदेखील पंजशीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले. पंजशीरचं संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सनं याबद्दलची माहिती दिली आहे.
काल रात्री हल्ला करणाऱ्या जवळपास ३५० तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून ४० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कैद केल्याची माहिती नॉर्दर्न अलायन्सनं दिली आहे. ही कारवाई करताना नॉदर्न अलायन्सच्या हाती अमेरिकन वाहनं आणि हत्यारं लागली आहेत. सोमवारी रात्रीदेखील तालिबानी दहशतवाद्यांनी पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही नॉर्दर्न अलायन्सनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा
स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजशीरमध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या गोलबहार प्रांतात तालिबानी दहशतवादी आणि नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांमध्ये संघर्ष झाला. या भागातला एक पूलदेखील तालिबान्यांनी उडवला. हा पूल गोलबहार आणि पंजशीरला जोडतो.
सोमवारी रात्री तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यात ७-८ तालिबानी मारले गेले. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अहमद मसूद यांच्या नेतृत्त्वाखाली नॉर्दर्न अलायन्स अतिशय धीरोदात्तपणे तालिबानी संकटाचा सामना करत आहे.